दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचा विधानभवनाच्या परिसरात पूर्णाकृती पुतळा उभारण्याची विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांची मागणी !
मुंबई, ३० डिसेंबर (वार्ता.) – दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्याचे स्मरण भावी पिढीला व्हावे, यासाठी विधानभवनाच्या परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांकडून करण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी औचित्याच्या मुद्यांतर्गत हे सूत्र उपस्थित केले होते.
मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी पुतळा उभारण्याविषयी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. सभागृहातील सर्वपक्षीय सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी याविषयी निर्णय घेण्यासाठी स्वत:च्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार जानेवारी २०२२ पर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.