सातारा येथे बालविकास प्रकल्प अधिकार्यामुळे अंगणवाडी सेविकांचा मृत्यू !
अधिकार्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! अधिकार्यांचे वर्तन अयोग्य असणे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे. यावर सर्वस्तरावर उपाययोजना निघणे आवश्यक आहे.
सातारा, ३० डिसेंबर (वार्ता.) – पाटण (जिल्हा सातारा) येथील बालविकास अधिकारी सीमा कांबळे या अंगणवाडी सेविकांशी क्रुरपणे वागतात. सतत प्रशासकीय कारवाई करण्याची धमकी देतात, तसेच नोटीस देण्याची धमकी देतात. त्यांच्या या वागणुकीमुळे माजगाव येथील अंगणवाडी सेविका मनीषा संजयकुमार पाटील आणि चाफळ येथील अंगणवाडी सेविका शमाबी इस्माईल काझी या दोघींचा मृत्यू झाला आहे, अशी तक्रार दोघींच्या पतींनी सातारा जिल्हा अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अर्चना अहिरेकर यांच्याकडे केली आहे.
१. तक्रारीची गंभीर नोंद घेऊन संघटनेच्या वतीने चाफळ येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सभा घेण्यात आली. या वेळी तालुका पंचायत समिती सदस्या रूपाली पवार आणि संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
२. या बैठकीत सीमा कांबळे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यामध्ये कोणतीही नोटीस न देता या ना त्या कारणावरून विनावेतन सेवा करवून घेणे, योग्य कारणासाठी रजा मागूनही रजा न देणे, सतत अपमानास्पद शब्द वापरून तशी वागणूक देऊन नोंदी लिहिण्याविषयी मार्गदर्शन न करता त्रास देणे अशा तक्रारी करण्यात आल्या.
३. त्यामुळे सीमा कांबळे यांची चौकशी होऊन त्यांच्यावर तातडीने योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी माजगाव आणि चाफळ येथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रूपाली पवार यांच्याकडे केली आहे.
४. पवार यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हा विषय मांडून याविषयी गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे.