मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण ! – भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी
मुंबई, ३० डिसेंबर – अनेक वर्षांपासून चालू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. हे काम संथगतीने चालू असल्यामुळे चालक आणि प्रवाशी यांना नाहक त्रास अन् आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, अशी माहिती तारांकित प्रश्नाद्वारे विधानसभा सभागृहात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी शासनाचे लक्ष वेधले.
भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी म्हणाले, ‘‘या महामार्गावर होत असलेल्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे लाखो लिटर इंधन वाया जात असून नागरिक आणि प्रवासी यांना मोठ्या प्रमाणात शारीरिक, मानसिक त्रास तसेच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. महामार्गाच्या १० टप्प्यांचे काम करणार्या ११ पैकी मोजके कंत्राटदार वगळता अन्य कंत्राटदारांनी ६० टक्क्यांपर्यंतही काम केलेले नाही.’’ (मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक कंत्राटदारांनी ६० टक्क्यांपर्यंत न करणे हे धक्कादायक आहे ! अशा प्रकारे विलंबाने काम करणार्या ठेकेदारांवर शासनाने काय कारवाई केली तेही सांगणे अपेक्षित आहे ! – संपादक)
या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या पनवेल ते इंदापूर (८४ किलोमीटर) या लांबीतील चौपदरीकरणाचे काम केंद्रशासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येते. हे काम संथगतीने चालू असून उर्वरीत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून तसेच महामार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघात होऊ नयेत यादृष्टीने वाहतूक सदृश्य स्थिती राखण्यासाठी कंत्राटदाराच्या व्ययाने अन् उत्तरदायीपणे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.