आमदारांच्या तक्रारीची पोलीस नोंद घेत नसतील, तर सर्वसामान्यांचे काय ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुंबई, ३० डिसेंबर (वार्ता.) – भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या भूमीवर गुंडांनी अवैधरित्या ताबा केला आणि ते तक्रार करायला गेल्यावर पोलीस ठाण्यात ‘असे पुष्कळ आमदार पाहिले आहेत’, असे उत्तर दिले गेले. याप्रकरणी मी स्वत: आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष घातल्यावर ती तक्रार प्रविष्ट झाली. त्यामुळे आमदारांच्या तक्रारीची पोलीस नोंद घेत नसतील, तर सर्वसामान्यांचे काय ? असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. ते अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत बोलत होते. (देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेला प्रश्न गंभीर असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून यापेक्षा काय अपेक्षा ठेवणार ? – संपादक)

१. राज्यात ‘शिवभोजन’च्या नावाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम चालू आहे. या योजनेत राज्यात एकूण १ सहस्र ५४८ केंद्रे चालू असून अनेक ठिकाणी खोट्या पद्धतीने काम चालू आहे.

२. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागांना २ लाख ५० सहस्र ३८८ कोटी रुपये देण्यात आले, तर काँग्रेसला १ लाख १ सहस्र ७६६ कोटी रुपये, ज्यांचे सर्वाधिक आमदार आहेत त्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला केवळ ५४ सहस्र ३४३ कोटी रुपये देण्यात आले.

३. कोरोना कार्यकाळात राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. १८ रुपयांच्या मास्कची ३७० रुपयांत खरेदी, ४०० रुपयांच्या पीपीई किट’ची २ सहस्र रुपयांत खरेदी, ५ लाख रुपयांचे ‘व्हेंटिलेटर’ १८ लाख रुपयांत, तसेच कोरोना केंद्र निर्मितीत गाद्या, पंखे, औषध खरेदी अशा प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कुठल्याही बैठकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होत नाही का ? – देवेंद्र फडणवीस

या प्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मंदिरात, मंत्रीमंडळ बैठकीत, मंत्रालयात, अधिवेशनात, शेतकर्‍यांना साहाय्य न करण्यासाठी, तसेच विकासाच्या प्रत्येक कामात कोरोनाचा संसर्ग होतो, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कुठल्याही बैठकांमध्ये, नेत्यांकडील विवाहात, तसेच सत्ताधारी पक्षांच्या आंदोलनांमध्ये कोरोनाचा संसर्ग तो होत नाही का ?’’