सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले; परंतु समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !
रविवारपासून नवीन लेखमाला !
‘कुणालाही सूक्ष्मातून ज्ञान मिळत असल्यास इतरांना त्याचे अप्रूप असते. ‘सूक्ष्मातून ज्ञान मिळणे’, म्हणजे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, म्हणजेच सूक्ष्मातील अज्ञात स्रोतांकडून येणारे ज्ञानयुक्त विचार ग्रहण करणे. असे ज्ञान काही वेळा दैवी शक्ती किंवा ज्ञानी आत्मे देतात. काही वेळा अतृप्त आत्मे किंवा अनिष्ट शक्ती त्रास देण्याच्या उद्देशानेही ज्ञान देऊ शकतात. अनिष्ट शक्तींकडून मिळणारे ज्ञान ग्रहण करतांना काही वेळा ‘माहिती चुकीची असणे, भाषा अत्यंत कठीण असणे किंवा त्यामध्ये त्रासदायक शक्ती असणे’, या गोष्टी लक्षात येतात. ही सर्व प्रक्रिया सूक्ष्म स्तरावर होत असल्यामुळे या संदर्भात ‘नक्की काय घडत आहे ?’, हे आपल्याला कळत नाही. काही वेळा त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात त्रासदायक शक्ती असते की, आपण नकळत त्या ज्ञानाच्या अधीन होतो. गुरुकृपा असेल, तरच त्यातून बाहेर पडू शकतो. सनातनच्या साधकांना मिळालेल्या काही ज्ञानामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर त्रासदायक शक्ती होती की, त्यातील काही धारिका मला १० ते १५ वर्षे वाचणे शक्य होत नव्हते. आता कालमहात्म्यानुसार या धारिकांमधील त्रासदायक शक्ती उणावल्यामुळे हे ज्ञान वाचणे शक्य झाले आहे. या कठीण ज्ञानातून अधिक नाविन्यपूर्ण ज्ञान मिळाल्यामुळे ते वाचून अधिक आनंदही मिळतो. काही वेळा या धारिका वाचतांना कठीण ज्ञानाचा अर्थ कळत नसल्याने केवळ त्याचे व्याकरण पडताळणे शक्य होत होते.
हे अद्वितीय ज्ञान ग्रंथांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचण्यास काही काळ जाऊ शकतो. वाचकांना ‘हे ज्ञान आणि त्यातील काठिण्य अनुभवता यावे’, यासाठी या सदराच्या माध्यमातून काही ज्ञान प्रकाशित करणार आहोत. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील जागेच्या मर्यादेमुळे येथे पूर्ण ज्ञान देणे शक्य नसल्याने येथे केवळ प्रत्येक विषयाची अनुक्रमणिका देणार आहोत. त्यामुळे वाचकांना ‘ज्ञानाचा विषय काय आहे ?’, हे कळू शकेल आणि त्या संदर्भातील सविस्तर ज्ञान संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
ही लेखमाला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रत्येक रविवार आणि गुरुवार या दिवशी प्रकाशित करण्यात येईल, तसेच साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या प्रत्येक अंकात प्रकाशित करण्यात येईल. |
|