हिंदु मंदिरात हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकार आणि न्यायालय यांना नाही ! – स्वामी परिपूर्णानंद महाराज, तेलंगाणा

‘हिंदु देवस्थानांना सेक्युलर (निधर्मी) करण्याचे षड्यंत्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – हिंदु मंदिरांच्या व्यवस्थापन समितीमध्ये अन्य धर्मियांनी घुसखोरी केली आहे. हिंदु मंदिरांच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. जे निधर्मी लोक हिंदु मंदिरांचा कारभार चालवू पहात आहेत, तेच हिंदूंच्या देवतांना ‘सैतान’ मानतात. मंदिर परिसराजवळ अन्य धर्मीय स्वतःची दुकाने थाटतात; मात्र मशिदी आणि चर्च यांच्या जवळून हिंदूंच्या उत्सवांची मिरवणूक जाणार असेल, तर त्याला विरोध केला जातो. सध्या हिंदूंची मंदिरे अन्य धर्मियांच्या कह्यात देण्याचा निर्णय हिंदूंवर लादला जात आहे. हिंदूंच्या मंदिरांची संपत्ती, नियम यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकार आणि न्यायालय यांना नाही, असे स्पष्ट प्रतिपादन तेलंगाणा येथील स्वामी परिपूर्णानंद महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु देवस्थानांना सेक्युलर (निधर्मी) करण्याचे षड्यंत्र !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. या विशेष संवादात ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस्’चे प्रवक्ते आणि सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, कर्नाटक येथील अधिवक्ता श्रीहरि कुत्स अन् हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण २ सहस्र ३१३ जणांनी पाहिले.

राज्यघटनेनुसार हिंदूंना मंदिरांची व्यवस्था पहाण्याचा पूर्ण अधिकार ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय आणि प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस्

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

सरकार कोणत्याही प्रकारे हिंदूंच्या मंदिरांना नियंत्रणात ठेवू शकत नाही. भक्त आणि भाविक जो पैसा हिंदूंच्या मंदिरात अर्पण करतात, तो पैसा सरकार इतर धर्मियांसाठी कसा वापरू शकते ? हा हिंदूंविषयी केलेला विश्वासघात आणि घोटाळा आहे. मंदिरांत केवळ देवतांचे नियम चालणार. हिंदूंच्या मंदिर व्यवस्थापनात अन्य धर्मीय हस्तक्षेप करून हिंदूंची मंदिरे भ्रष्ट करत आहेत. राज्यघटनेतील अनुच्छेद २६ नुसार ‘हिंदूंना आपल्या मंदिरांची व्यवस्था पहाण्याचा पूर्ण अधिकार आहे’, तसेच अनुच्छेद २५ नुसार ‘हिंदूंना आपली धार्मिक स्वतंत्रता अबाधित ठेवून धर्म आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे.’ याविषयी हिंदूंचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात मांडणार असून जर न्यायालयाने म्हणणे ऐकले नाही, तर जनतेमध्ये जागृती करून हिंदूंचा आवाज लोकप्रतिनिधींद्वारे संसदेत पोचवणार आहोत.

सरकार मंदिरांना प्रेक्षणीय आणि पर्यटन स्थळांप्रमाणे पहात आहे ! – अधिवक्ता श्रीहरि कुत्स, कर्नाटक

अन्य धर्मियांना मंदिर परिसरात दुकाने उभारण्यास दिली जात आहेत. मशीद परिसरात हिंदूंना दुकाने उभारण्यास दिली जातील का ? सरकार मंदिरांना प्रेक्षणीय आणि पर्यटन स्थळांप्रमाणे पहात आहे, हे थांबले पाहिजे.

हिंदूंच्या मंदिर संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न एक सुनियोजित षड्यंत्र ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. नरेंद्र सुर्वे

मंदिरे ही धर्माची आधारशीला आहेत. विविध सरकारांनी मंदिरे अधिग्रहित करून मंदिरांना लुटण्याचा प्रारंभ केला. अनेक मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण करून ती हडप केली. मंदिरांच्या धनाचा गैरवापर होण्यासह अल्पसंख्यांकांना सुविधा देणे आदी अनेक गोष्टींसाठी केला गेला. आता त्यांनी धार्मिक परंपरामध्ये हस्तक्षेप करायला प्रारंभ केला आहे. हिंदूंच्या मंदिर संस्कृतीला नष्ट करण्यासाठी एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे प्रयत्न केले जात आहेत, हे वेदनादायी असून यामुळे हिंदूंच्या मनात असंतोष निर्माण होत आहे. हिंदु समाज हे आता अधिक काळ सहन करणार नाही.