आनंदी आणि संतांप्रती कृतज्ञताभावात असणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. विशाखा चौधरी (वय २२ वर्षे) !
‘कु. विशाखा चौधरी संतसेवा करते. विशाखाताई ९ मासांपूर्वी माझ्या समवेत खोलीत रहायला आली. तेव्हापासून आमची मैत्री झाली. एका संतांनी मला आणि कु. विशाखाला प्रयत्नांची दिलेली दिशा अन् कु. विशाखाची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. संतांनी साधिकांना एकमेकींकडून शिकायला सांगणे
१ अ. संतांनी साधिकेला ‘कु. विशाखाकडून ‘निरागसता’ आणि विशाखाने साधिकेकडून ‘गांभीर्याने वागणे’ शिकायला हवे’, असे सांगणे : ‘विशाखाताई पूर्वी निरागसपणे बोलायची आणि तिच्या हालचालीही लहान बाळाप्रमाणे असायच्या. त्या वेळी एक संत मला म्हणाले, ‘‘विशाखा २२ वर्षांची असून किती निरागस आहे ना ! ती मोठी आहे, तर तिने मोठ्यांप्रमाणे वागायला पाहिजे. किती वर्षे लहान रहाणार ? तुझे तिच्या उलट आहे. तू १६ वर्षांची असूनही मोठ्या माणसांसारखी रहातेस. तिला तुझ्यासारखे वागायला शिकव आणि तू तिच्याकडून ‘आनंदी आणि निरागस कसे रहायचे ?’, ते शिकून घे. प्रत्येक वेळी गंभीर रहायचे नाही. काही प्रसंगी हसायलाही हवे. (तेव्हा मी फार हसत नसे.) दोघी एकमेकींकडून शिका.’’ विशाखाताईला संतांचा निरोप सांगितल्यावर तोंडवळ्यावर शरणागतभाव जाणवला. त्यानंतर तिने स्वतःत तसे पालटही केले. त्यानंतर मला विशाखातील एकेक गुण लक्षात यायला लागले आणि मलाही तिच्याशी बोलून आनंदी रहाता येऊ लागले.
२. कु. विशाखा चौधरी यांची गुणवैशिष्ट्ये
२ अ. साधकांना साहाय्य करण्याच्या उद्देशाने तत्त्वनिष्ठतेने चुका सांगणे आणि मनात पूर्वग्रह न ठेवणे : आमच्या खोलीतील एक साधिका अव्यवस्थित रहात होती. आरंभी विशाखाताईने तिला समजून घेऊन प्रेमाने जाणीव करून दिली. त्यानंतरही तिच्यात पालट झाला नाही. हे पाहून विशाखाने तिला तत्त्वनिष्ठतेने चुका सांगितल्या. त्यानंतर तिने मला विचारले, ‘‘माझे बोलण्यात काही चुकले नाही ना ?’’ मी तिला म्हणाले, ‘‘नाही. तू तत्त्वनिष्ठतेने तिला सांगितलेस.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘तत्त्वनिष्ठ असले, तरी माझ्या मनात तिच्याविषयी काही पूर्वग्रह निर्माण होऊ नये. माझ्या बोलण्यातून चिडचिड किंवा प्रतिक्रिया व्यक्त होऊ नयेत. ‘मी तिला साहाय्य म्हणून चुका सांगायला पाहिजेत’, असे मला वाटते.’’ तिचे बोलणे ऐकून ‘एखाद्याला त्याची चूक साधनेच्या स्तरावर कशी सांगायला हवी ?’, हे मला शिकायला मिळाले.
विशाखाच्या मनात कुणाविषयीही प्रतिक्रिया येत नसल्याने तिला समोरच्या व्यक्तीला चुका व्यवस्थित सांगता येतात आणि प्रेमाने समजावता येते. त्यामुळे तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या साधकांमध्येही चांगला पालट होतो.
२ आ. प्रेमभाव : विशाखाताई तिला आलेल्या अनुभूती सर्वांना सांगते. त्यामुळे तिच्याकडून नवीन काहीतरी शिकायला मिळते. ती सर्वांशी मनमोकळेपणाने बोलते. ती कुणाशीही वागतांना भेदभाव करत नाही. एखादी साधिका तिच्याशी चांगले बोलत नसेल, तर ती तिच्याशी बोलायचे टाळत नाही. तिच्या मनात कुणाविषयीही पूर्वग्रह नसतो. सर्वांशी प्रेमाने बोलल्याने ती सर्वांनाच आवडते.
२ इ. चुकांमधून शिकणे : चुका झाल्या, तरीही त्यांतून लवकर शिकून ती आनंदी रहाते.
२ ई. भाव
२ ई १. परात्पर गुरुदेवांप्रती भाव : विशाखाताईचा परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. मी तिला परात्पर गुरुदेवांविषयी काही प्रसंग गंमत म्हणून सांगितल्यावर ती मला ‘त्यातून काय शिकायचे ?’, हे सांगत असे. तिला पू. देसाईआजी-आजोबांची सेवा करतांना आलेल्या विविध अनुभूती ती मला सांगत असते. त्या वेळी तिचा भाव जागृत होतो. ते पाहून मलाही आनंद मिळतो.
२ ई २. याचकभाव : तिचे हात, पाय आणि मान दुखल्यावर ती देवाला सांगते, ‘देवा, मी तुझा नंदीबैल (सेवक) आहे. तू सांगशील, तसेच मला करायचे आहे. तूच मला सेवा करण्यासाठी शक्ती दे.’ तिने अशी प्रार्थना आणि नामजपादी उपाय केल्यानंतर तिचे दुखणे न्यून होऊन ती पुन्हा उत्साहाने सेवा करते.
३. प्रार्थना
‘परात्पर गुरु डॉक्टर, तुम्हीच मला विशाखाताईसारखी प्रेमळ आध्यात्मिक मैत्रीण दिलीत. ‘मला तिच्यातील ‘तुमच्याप्रती असलेला भाव आणि सर्वांशी प्रेमभावाने वागणे’ हे गुण शिकता येऊ देत आणि तिची लवकरात लवकर जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका होऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना !’
– कु. करुणा मुळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२१)