‘ओमिक्रॉन’च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या प्रशासनाला सूचना

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या काटेकोर कार्यवाहीसह परदेशातून येणार्‍या नागरिकांची तपासणी करा !

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे, तसेच महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचीही संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर कार्यवाही करावी. परदेशातून जिल्ह्यात येणार्‍या नागरिकांची माहिती मिळवून ७ दिवसांनंतर पुन्हा त्यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करावी. त्याचबरोबर विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी २८ डिसेंबरला ‘ओमिक्रॉन’ विषाणूच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या सूचना

१. फेब्रुवारी मासातील संभाव्य रुग्णवाढीचा अंदाज घेऊन आतापासूनच आपली सर्व सिद्धता असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी एकत्रित बैठक घ्यावी.

२. जत्रांच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित देवस्थान समित्यांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत. येणार्‍या भाविकांची ‘थर्मल’ तपासणी आणि कोरोना प्रतिबंधात्मक दुसरा डोस न घेतलेल्यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ तपासणी करावी.

३. आरोग्य विभागाने प्राणवायूचा (ऑक्सीजनचा) साठा, त्या अनुषंगाने लागणारी साधनसामुग्री आणि ‘जनरेटर’ सुस्थितीत ठेवावेत. आवश्यक त्या मनुष्यबळांसाठी प्रस्ताव पाठवावेत. जिल्ह्यातील ‘कोरोना केअर केंद्रां’चीही पूर्वसिद्धता ठेवावी.

४. जत्रा आणि विवाह सोहळे यांसाठी मोकळ्या मैदानात २५० संख्येची मर्यादा पाळली जाईल, यासाठी सतर्क रहावे. पुन्हा एकदा मास्क वापरण्याविषयी आवाहन करावे. त्याचबरोबर दंडात्मक कारवाईही करावी.

५. खासगी दवाखान्यांमध्ये येणार्‍या तापसदृश रुग्णांची तपासणी करावी. त्याविषयी तालुका आरोग्य अधिकार्‍यांकडे माहिती यायला हवी. बाहेरील राज्यांतून अथवा जिल्ह्यांतून येणार्‍या मजुरांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे २ डोस झाल्याविषयी तपासणी करावी. रात्रीच्या जमावबंदीचीही काटेकोरपणे कार्यवाही होईल, याविषयी पोलीस यंत्रणेने दक्षता घ्यावी.