गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने घाईघाईने रात्रीची संचारबंदी लागू करता येणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी – गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे घाईघाईने रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेता येणार नाही. कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची संख्या वाढत जात असल्यास कृती दलाची बैठक झाल्यानंतर ३ जानेवारी या दिवशी निर्बंध लावण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कोरोनाविषयक कृती समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
(सौजन्य : ANI News)
ते पुढे म्हणाले, ‘‘कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिक आपणहूनच पुढे येत नसल्यास राज्यशासन नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे बंधनकारक करणार आहे. २८ डिसेंबर या दिवशी कोरोनाबाधित नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. राज्यात लग्नसमारंभ चालू असल्याने ही वाढ झाली असावी. गोव्यात सध्या ३ सहस्र ५०० विदेशी नागरिक आहेत. विदेशी नागरिकांना कोरोनासंबंधी दुसर्यांदा चाचणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. विदेशातून गोव्यात येणार्यांना अलगीकरणात रहाणे बंधनकारक आहे.’’