वेगवान प्रवासासाठी देशात आणखी ७ बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणार !
मुंबई – देशात आणखी ७ ठिकाणी बुलेट ट्रेनचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सिद्ध करण्यात येत असल्याची माहिती नॅशनल रेल्वे हायस्पीड कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सतीशचंद्र अग्निहोत्री यांनी दिली.
मुंबई-नाशिक-नागपूर आणि मुंबई-पुणे-भाग्यनगर (हैदराबाद) बुलेट ट्रेन्सचाही यांत समावेश आहे. त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल ६ मासांत सादर करण्यात येणार आहे. मुंबई ते कर्णावती (अहमदाबाद) व्यतिरिक्त मुंबई ते नागपूर (७४० कि.मी.), देहली ते कर्णावती (८८६ कि.मी.), देहली ते अमृतसर (४५९ कि.मी.), मुंबई ते भाग्यनगर (७११ कि.मी.), चैन्नई ते म्हैसुरू (४३५ कि.मी.), वाराणसी ते हावडा (७६० कि.मी.), देहली ते वाराणसी (९४२ कि.मी.) असे हे नवीन मार्ग असणार आहेत.
मुंबई-नाशिक-नागपूर या ७३६ किलोमीटर मार्गाचेही सर्वेक्षण चालू आहे. ठाणे, नाशिक, नगर, संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांतून ही ट्रेन धावणार आहे. हा प्रवास चार घंट्यांत होणार आहे. मुंबई ते भाग्यनगर बुलेट ट्रेनचा मार्ग ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर, कर्नाटकातील गुलबर्गा आणि तेलंगाणातील तीन जिल्ह्यांतून असणार आहे. ९४२ किलोमीटर या सर्वाधिक लांबीच्या दिल्ली ते वाराणसी अयोध्येतून जाणार्या बुलेट ट्रेनचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे.