संस्कृती जतन महत्त्वाचे !

नोंद 

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी आणि राधा पाटील यांचा विवाह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल येथे पार पडला. विशेष म्हणजे अभिषेक हा संगणक अभियंता असून त्याची पत्नी राधा ही औषध आस्थापनात काम करते. दोघेही उच्चशिक्षित असून सांस्कृतिक परंपरा जपण्याचा दोघांचाही प्रयत्न स्तुत्य आहे. अभिषेकच्या विवाहाच्या संदर्भात मिलिंद गुणाजी म्हणाले, ‘‘आम्ही एक कुटुंब म्हणून आपली संस्कृती आणि वारसा जपला आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचा, अतुलनीय पर्यटनस्थळांचा आणि अजोड गडकिल्ल्यांच्या खजिन्याचा मी नेहमीच प्रचार करत आलो आहे. महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा व्हावा, अशी आमची इच्छा होती. हा महत्त्वाचा संदेश आमच्या जीवनशैलीतून देण्याचा आमचा प्रयत्न होता.’’

वास्तविक विवाह हा १६ संस्कारांपैकी एक मुख्य संस्कार आहे. त्यामुळे त्यातील विविध विधींनाही तितकेच महत्त्व आहे. अलीकडच्या काही वर्षांत मात्र विवाहाचे व्यावसायिकरण झाले असून या संस्कारात नसलेले विवाहपूर्व (प्री वेडींग) छायाचित्र काढण्यासह अनेक गोष्टीकडे आज ‘इव्हेंट’ (कार्यक्रम) म्हणून पाहिले जाते. त्यात विशेषकरून जे अभिनेते, तसेच प्रसिद्ध व्यक्ती असतात, ते यातून वेगळे काहीतरी करून लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक विवाह करण्यासाठी भारतात अनेक चांगली ठिकाणे असून अनेक चांगल्या मंदिरांचे सात्त्विक परिसरही उपलब्ध आहेत; मात्र हे टाळून अलीकडे परदेशी जाऊन विवाह करण्याची ‘टूम’ जोरात आहे. ४ वर्षांपूर्वी प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी त्यांचा विवाह इटली या देशात केला. तसेच काही जण पाण्याखाली, उंच डोंगरावर, जंगलात अशा ठिकाणीही विवाह करून प्रसिद्धी मिळवतात.

समाज हा बहुतांश वेळा प्रसिद्ध व्यक्तींचा अनुयय करतो. त्यामुळे मान्यवरांनी हिंदु परंपरेतील संस्कृती-परंपरा यांचे जतन करत मिलिंद गुणाजी यांचा आदर्श समोर ठेवायला हवा. विवाह संस्काराकडे एक ‘इव्हेंट’म्हणून न पहाता त्यातूनही समाजाला काय देता येईल, याचा विचार करून तो केल्यास त्याचा लाभ होईल !

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर