ख्रिस्तीप्रेम नव्हे हिंदुद्वेष !
संपादकीय
मानवतेच्या कथित तारणहार मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’शी संबंधित संस्थांची सर्व खाती रिझर्व्ह बँकेने गोठवली. यामुळे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांच्या जिवाला घोर लागला आहे. ऐन ख्रिसमसमध्ये हे झाल्यानेही या सर्वांना अतीव दुःख झाले. प्रत्यक्षात तेरेसा यांच्या मिशनरीज् ऑफ चॅरिटी या संस्थेने स्वतःच स्टेट बँकेला त्यांच्या सर्व खात्यांचे नूतनीकरण करण्यासाठी ‘नाही’ म्हटले; कारण ‘विदेशी योगदान नियमन नियम (एफ्.सी.आर्.ए.) २०११’ यानुसार आवश्यक नियम आणि अटींची पूर्तता करण्यास संस्था असमर्थ ठरली आहे. तरीही ऑक्टोबर मासापर्यंत या संस्थांची नोंदणी अधिकृत असूनही त्यांची वैधता डिसेंबर मासापर्यंत वाढवून देण्यात आली होती; मात्र आता ती संपली.
निधर्मीवाद्यांना तेरेसा यांच्या संस्थेतील रुग्ण आणि कर्मचारी यांच्याविषयी एवढाच कळवळा असेल, तर केरळस्थित ‘द सायरो मलबार चर्च’ या जगातील प्रचंड शक्तीशाली ख्रिस्ती संस्थेकडे हे सर्वजण साहाय्य मागू शकतात. देशातील सर्वांत श्रीमंत उद्योजक टाटा, अदानी, अंबानी यांच्यापेक्षाही, म्हणजे ३ लाख कोटी एवढी प्रचंड मोठी उलाढाल असणारे हे चर्च आहे. रहाता राहिला ख्रिसमसचा प्रश्न. शंकराचार्यांसह हिंदूंच्या साधू-संतांना हिंदूंच्या सणांच्या वेळी अटक केली गेली, तेव्हा कुणाला हा प्रश्न कधी पडला नव्हता. ‘ख्रिस्ती संस्था अधिकोषांच्या नूतनीकरणाचे नियमही पाळायला सिद्ध नाहीत, तरीही त्यांना काहीतरी विशेष सवलत द्यावी’, असे निधर्मीवाद्यांना वाटते, हे यातून लक्षात घेतले पाहिजे !
मानवतावादी नव्हे हिंदुद्वेषी !
मिशनर्यांना धर्मांतर करण्याच्या उद्देशानेच देशोदेशी पाठवले जाते. मदर तेरेसाही याच उद्देशाने शिक्षिका बनून आल्या आणि त्यांनी त्यांचा मोर्चा प्रथम त्यांच्या शाळेजवळील झोपडपट्टीतील गरिबांकडे वळवला अन् त्यांचे धर्मांतर चालू केले. असे करता करता त्यांनी पोप यांच्या अनुमतीने वर्ष १९५० मध्ये कोलकाता येथे ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज्’च्या नावाने जणू हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी मोठा अधिकृत ‘कारखानाच’ उघडला. अत्यंत हलाखीचे जीवन जगणारे दिन-दुबळे, रोगी, गटारात लोळणारे यांना नेऊन त्यांना कथित नवजीवन देऊन आणि त्यांच्यावर प्रेम केल्याचा आव आणल्याने त्यांना ‘मदर’ (माता) या नावाने प्रसिद्धी देण्यात येऊ लागली. बघता बघता त्यांच्या या ‘धर्मांतराच्या कारखान्या’च्या शाखा जगभर पसरू लागल्या. ५२ देशांत २२७ ठिकाणी धर्मांतराच्या षड्यंत्राची प्रतिकेंद्रे उभी राहिली. भारतातही त्यांच्या धर्मांतराच्या कामासाठी पैसा अर्थात्च विदेशातून येत होता, हे वेगळे सांगायला नको. शाळा, फिरती रुग्णालये, कुष्ठरोग उपचार केंद्रे, शिशूभवने, अनाथालये आणि आश्रमगृहे अशी व्यापक साखळी उभारून सेवाकार्याच्या नावाखाली लहान मुलांची तस्करी, मुलींचे लैंगिक शोषण, सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांना आमिषे दाखवून किंवा बरे करण्याच्या नावाखाली, धर्मांतर करण्याचे प्रचंड मोठे काम त्यांनी ‘चोख’ पार पाडले. बेंगळुरूच्या ‘युक्यूमेक्स ख्रिश्चियन सेंटर’चे व्यवस्थापक एम्.ए. थॉमस यांनी ४ दशकांपूर्वी म्हटले होते, ‘आता भारतात विदेशी पाद्री आयात करण्याची आवश्यकता नाही. भारतातीलच पाद्री ईशसेवेच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सक्षम आहेत.’ यावरून मिशनर्यांच्या भारतातील धर्मांतराच्या षड्यंत्राची कल्पना येईल. नुकतेच म्हणजे १४ डिसेंबर २०२१ या दिवशीच बडोदा येथील मदर तेरेसांच्या आश्रमावर अल्पवयीन मुलींचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचे आरोप झाले. बलपूर्वक बायबल वाचण्यास भाग पाडणे, बलपूर्वक ख्रिस्ती कुटुंबात विवाह लावून देणे असे प्रकार येथे मुलींच्या संदर्भात चालू आहेत. याचे अन्वेषण चालू आहे.
धर्मांतरासाठी अनेक पुरस्कार ?
ज्या पोपनी भारत ख्रिस्तमय करण्याची घोषणा केली, त्यांच्याच अंतर्गत मदर तेरेसा त्यांच्या या कामात प्रचंड मोठे ‘योगदान’ देत होत्या. त्यामुळे त्याच पोपनी त्यांना ख्रिस्त्यांमध्ये ‘चमत्कार सिद्ध करून दाखवल्यावर मिळणारे’ संतपदही बहाल केले आणि नोबेल पुरस्कारही दिला. भारतात प्रत्येक जिल्ह्यात मध्यवर्ती ख्रिस्ती मिशनरी शाळा स्थापन करणार्या इंग्रजांचा देश ब्रिटननेही तेरेसा यांना त्यांच्या देशाचा सर्वाेच्च पुरस्कार दिला; कारण अर्थात्च भारत ख्रिस्ती राष्ट्र बनवण्याचे त्यांचे उर्वरित कार्य त्या पूर्ण करत होत्या. ख्रिस्ती देशांनी त्यांचा गौरव करणे साहजिक होते; मात्र भारतातही त्यांना पद्मश्रीसह अनेक सन्मान देण्यात आले. ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर’, अशी घोषणा करणार्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काँग्रेसींमुळे भारतात एकही पुरस्कार मिळू शकला नाही, त्यांच्या वाट्याला केवळ अवहेलना आली. आज पूर्वांचल प्रदेश ख्रिस्त्यांच्या घशात जात असतांना, नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला ‘ख्रिस्ती राष्ट्र’ म्हणून घोषित केले असतांना ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर कसे आहे ?’, हे सिद्ध होत आहे. दुसरीकडे धर्मांतराच्या माध्यमातून हे राष्ट्रांतर घडवण्यात सिंहाचा वाटा उचलणार्या तेरेसा यांना अर्थात्च ख्रिस्ती सून असलेल्या नेहरूंच्या घराण्याच्या काँग्रेसने भारताचा सर्वाेच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ दिले.
निधर्मीवादी आणि ख्रिस्तीप्रेमी वेळोवेळी ख्रिस्ती मिशनर्यांच्या कामाचा गौरव करत असतात. ‘ख्रिसमसला राष्ट्रीय सण म्हणून घोषित का केले जात नाही ?’, असाही प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो. धर्मांतर करणार्या मिशनर्यांच्या आर्थिक नाड्या, म्हणजे विदेशातून त्यांना येणारा पैसा शासनाने रोखून धरला आहे. धर्मांतरविरोधी कायद्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आग्रही झाले आहेत. ‘घरवापसी’विषयीही जागृती होत आहे. त्यामुळे कुणाचे ख्रिस्तीप्रेम उतू जाऊ लागले, तरी सामान्य जनतेला आता या सर्वांचे खरे स्वरूप कळून चुकले आहे, हे निश्चित !