अपक्ष आमदार किरण सरनाईक यांनी केला विधान परिषदेतून सभात्याग !

प्रश्न वर्षानुवर्षे सोडवले जात नसल्याविषयी असंतोष !

लोकप्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न वर्षानुवर्षे रखडणे, हे लोकशाहीचे दुर्दैव ! – संपादक 

आमदार किरण सरनाईक

मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न वर्षानुवर्षे सोडवले जात नसल्याविषयी तीव्र शब्दांत असंतोष व्यक्त करत अपक्ष आमदार किरण सरनाईक यांनी सभात्याग केला. २८ डिसेंबर या दिवशी आमदार किरण सरनाईक हे विधान परिषदेत लक्षवेधीवर बोलण्यासाठी उभे राहिले असतांना त्यांनी सभागृहात मांडलेले अनेक प्रश्न प्रलंबित असल्याची भावना तीव्रतेने व्यक्त केली; मात्र त्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना झाल्याने सभागृहाच्या कामकाजाविषयी असंतोष व्यक्त करत आमदार सरनाईक यांनी सभात्याग केला.

किरण सरनाईक यांनी शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे होणार्‍या शासकीय भरतीप्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करून या कार्यप्रणालीद्वारे होणारी शिक्षक भरती प्रक्रिया बंद करण्याची लक्षवेधी सभागृहात मांडली. ही लक्षवेधी मांडतांना त्यांनी सभागृहातील प्रश्न सुटत नसल्याची भावना तीव्रतेने मांडण्यास प्रारंभ केला. कोकणात सिंचन प्रकल्प चालू होण्याविषयी शिवसेनेचे रामदास कदम यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित करूनही ३० वर्षे याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दाखलाही सरनाईक यांनी या वेळी दिला. उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी या वेळी सरनाईक यांना बोलतांना रोखले, तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अपसमज झाला असल्याचे नमूद केले. यावर संताप अनावर होऊन सरनाईक यांनी प्रश्नाला न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत सभात्याग केला.