शांत, अंतर्मुख आणि परात्पर गुरुदेवांप्रती भाव असणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. सुनील नाईक !
२९.१२.२०२१ या दिवशी श्री. सुनील नाईक आणि सौ. सुषमा नाईक यांच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्त सौ. सुषमा यांना श्री. सुनील यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. सुनील नाईक आणि सौ. सुषमा नाईक यांना विवाहाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. प्रेमभाव : ‘माझ्या आईची प्रकृती ठीक नसतांना श्री. सुनील स्वतःहून तिला आधुनिक वैद्यांकडे घेऊन जातात आणि घरी येतांना तिची औषधेही घेऊन येतात. ते माझ्या माहेरच्या घरातील दुरुस्तीची, तसेच अन्य कामेही दायित्व घेऊन करतात. त्यामुळे आईला त्यांचा आधार वाटतो. ‘त्या दोघांचे नाते आई-मुलाचे आहे’, असे वाटते. आई त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलते.
२. शांत आणि स्थिर : माझ्या संदर्भात एखादा प्रसंग झाल्यास किंवा अन्य प्रसंगातही सुनील त्यांचे मत व्यक्त न करता शांत आणि स्थिर असतात. दुसर्या दिवशी ते मला माझ्या चुकांची जाणीव करून देतात.
३. समंजस : ते मला त्यांच्या मनातील विचार मनमोकळेपणाने सांगतात आणि मीही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलते. त्यामुळे आमच्यात एकमेकांना समजून घेण्याचा भाग होतो. आमच्यात क्वचितच वाद झाले आहेत.
४. वर्तमानकाळात रहाणे : एकदा मी त्यांच्याशी भूतकाळातील एका प्रसंगाविषयी बोलत होते. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘आपण भूतकाळाचा विचार कशाला करायचा ? ‘मनात साधनेविषयी काय विचारप्रकिया आहे ?’, याचाच विचार करायला हवा.’’
५. आसक्ती नसणे : ‘त्यांनी स्वतःचा विचार केला आहे’, असे मी कधी पाहिले नाही. त्यांच्याकडील एखादी वस्तू इतरांना हवी असल्यास ते लगेच देतात.
६. साधनेची तळमळ : ते मला सतत सांगतात, ‘‘जीवनात कितीही अडचणी आल्या किंवा काही प्रसंग झाले, तरीही साधना सोडायची नाही. तू माझ्यात किंवा सासरी झालेल्या प्रसंगांत अडकू नकोस. तू केवळ साधना होण्याच्या दृष्टीने प्रयत्न कर आणि साधनेत पुढे जा. मला तुझ्याकडून एवढेच अपेक्षित आहे.’’
७. गुरुसेवेची तळमळ : काही वेळा शारीरिक श्रमाची सेवा करतांना त्यांना शारीरिक त्रास होत असतो; पण ते मला त्याविषयी कधीही सांगत नाहीत. ते म्हणतात, ‘‘हे शरीर गुरूंचे आहे. त्यांच्यासाठी शरीर झिजवायचे आहे. आपण स्वतःचा विचार करायचा नाही.’’
८. संतांनी कौतुक करणे : नोव्हेंबर २०२१ मध्ये सनातनचे संत पू. संदीप आळशी माझ्याशी सहज बोलतांना म्हणाले, ‘‘मी तुझ्या यजमानांना भोजनकक्षात पाहिले. त्यांच्याकडे पाहून शांत वाटते. त्यांची साधना चांगली चालू आहे. ‘ते अंतर्मुख आहेत’, असे जाणवते.’’
९. भाव
अ. त्यांना गुरुमाऊलीची आठवण आल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू असतात. ते अल्प बोलतात; पण ते सतत अनुसंधानात असतात.
आ. ते लागवडीत सेवा करत असल्यामुळे त्यांची वर-खाली धावपळ होते, तरीही ते पायर्यांचाच वापर करतात. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही उद्वाहकाचा (लिफ्टचा) वापर का करत नाही ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘उद्वाहक वयस्कर आणि आजारी साधक यांच्यासाठी आहे. उद्वाहकामुळे विजेचे देयकही पुष्कळ येते. गुरूंचे पैसे विनाकारण का वापरायचे ?’’
१०. प्रार्थना आणि कृतज्ञता : ‘गुरुमाऊली, तुमच्या कृपेचा वर्षाव आमच्यावर सतत होत असतो. तुमची आमच्यावर सदोदित कृपादृष्टी असू दे. ‘तुम्हाला अपेक्षित अशी साधना तुम्ही आमच्याकडून करवून घेणारच आहात’, त्यासाठी आमच्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. गुरुमाऊली, कोटीशः कृतज्ञता !
– सौ. सुषमा नाईक (पूर्वाश्रमाची कु. सुषमा पेडणेकर) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१२.२०२१)