आपण कुत्री, मांजर आणि कोंबडी यांचे प्रतिनिधित्‍व करत नाही, याचे आमदारांनी भान ठेवावे ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

विधीमंडळातील सदस्‍यांच्‍या अयोग्‍य वर्तवणुकीवरून उपमुख्‍यमंत्र्यांनी आमदारांचे कान टोचले !

भारताला स्‍वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, तरी अजूनही लोकप्रतिनिधींचे वागणे आदर्श असायला हवे, असे विधीमंडळात उपमुख्‍यमंत्र्यांना सांगावे लागते, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना लज्‍जास्‍पद आहे. असे लोकप्रतिनिधी जनतेशी कसे वागत असतील, याचाही विचार न केलेला बरा ! – संपादक 

अजित पवार

मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – विधीमंडळाच्‍या सभागृहामध्‍ये निवडून येतांना लाखो मतदार तुमच्‍याकडे बघून मतदान करतात. त्‍यातून तुम्‍ही या सभागृहाचे प्रतिनिधित्‍व करता. दोन्‍ही बाजूच्‍या आमदारांकडून आदर्श वर्तन आणि त्‍यांच्‍या वर्तनामध्‍ये सुधारणा झाली पाहिजे. आता सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. लाखो लोक मतदान करतात, त्‍या वेळी आमदार येथे येतात. आपण कुत्री, मांजर आणि कोंबड्या यांचे प्रतिनिधित्‍व करत नाही, याचे भान राखले पाहिजे. विधीमंडळाच्‍या आवारात प्राण्‍यांचा आवाज काढणे हा सभागृह सदस्‍य आणि मतदार यांचा विश्‍वासघात केल्‍यासारखे आहे. आपला माणूस तिथे जाऊन असे आवाज काढतो आणि टवाळी करतो यावर मतदारांना काय वाटेल ? त्‍यामुळे सर्वांनीच ही गोष्‍ट गांभीर्याने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत २८ डिसेंबर या दिवशी एका निवेदनाद्वारे केले. आमदारांच्‍या आदर्श वर्तनावरून त्‍यांंनी निवेदनाद्वारे आमदारांचे कान टोचले.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्‍य ठाकरे यांना उद्देशून ‘मॅव मॅव’ आवाज काढल्‍यावरून  याआधीही विधासभेत चर्चा घेण्‍यात आली होती. त्‍या वेळी भाजप नेत्‍यांनीही हे योग्‍य नसल्‍याचे म्‍हटले होते. विरोधकांनीही आक्रमकपणे याविषयी विधीमंडळ आणि आवारामध्‍ये सदस्‍यांच्‍या वर्तणुकीविषयी आचारसंहिता असावी, अशी भूमिका घेतली. त्‍यानंतर अधिवेशनाच्‍या शेवटच्‍या दिवशी विधानसभा उपाध्‍यक्षांच्‍या दालनात ‘सभासदांचे वर्तन कसे असावे ?’, याविषयी बैठक घेण्‍यात आली. त्‍यांनतर सभासद वर्तनाविषयी १ नियमावली प्रसिद्ध करण्‍यात आली आहे.

याविषयी अजित पवार पुढे म्‍हणाले की,

१. आचारसंहितेचे पालन करणे सभागृहातील प्रत्‍येक सदस्‍याचे कर्तव्‍य आहे. प्रत्‍येकाने दायित्‍वाने वागले पाहिजे. या सभागृहामध्‍ये काही जुने, तर काही नवीन सदस्‍य असतात. विधीमंडळाचा सदस्‍य विधीमंडळ आणि आवारात कसा वागतो, सार्वजनिक जीवनात तो कसा वावरतो, यातून सभागृह आणि विधीमंडळ यांची प्रतिमा ठरते. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये आमदारांपैकी काही जणांच्‍या वर्तनामुळे सभागृहाच्‍या मानसन्‍मानाला नक्‍कीच धक्‍का बसला आहे. ही प्रतिमा आणखीन ढासळू नये. तिला उंचावण्‍याचा लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला पाहिजे. सर्वांनी सभागृहातील विधीमंडळाच्‍या आवारात सार्वजनिक जीवनातील स्‍वतःच्‍या वर्तनाविषयी अंर्तमुख होऊन विचार करण्‍याची आवश्‍यकता आहे.

. विधानभवनात सकाळी या संदर्भात झालेल्‍या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक यांनी ‘सदस्‍यांच्‍या वर्तनात सुधारणा झाली पाहिजे’ यावर पक्षीय जोडे बाजूला ठेवून चिंता व्‍यक्‍त केली. सदस्‍यांना वर्तनाची जाणीव करून देण्‍यावरही सहमती दर्शवली.
‘संसदीय सदाचार आणि शिष्‍टाचार यांची आचारसंहिता’ हे पुस्‍तक सर्वांनी वाचले पाहिजे. काही जण आमदार झाल्‍यावर सर्व समजते, या धुंदीत वागत आहेत.

३. सभागृहात काहींनी तर सभागृहात बसतांना आणि बाहेर जातांना अध्‍यक्षांना नमस्‍कार करणे सोडून दिले आहे. त्‍यांना तारतम्‍य राहिले नाही. मुख्‍यमंत्र्याच्‍या आसंदीवरही काही आमदार येऊन बसतात. त्‍यांनी शिस्‍त पाळली पाहिजे.

४. विधानसभा अध्‍यक्षांनी कुणी चुकल्‍यास त्‍यांना ४ घंटे बाहेर ठेवण्‍याचा नियम करावा. त्‍यामुळे त्‍याला त्‍याची चूक कळेल. ४ घंटे अल्‍प वाटत असतील, तर १ दिवस बाहेर ठेवा; मात्र १२-१२ मास कोणत्‍याही सदस्‍याला बाहेर पाठवू नका.