साधकांनो, एखाद्या कृतीत चूक झाली नसल्यास क्षमायाचना करण्याऐवजी, ती कृती अजून चांगल्या प्रकारे करवून घेण्यासाठी देवाला प्रार्थना करा !
‘२०.४.२०१९ या दिवशी मी आणि श्री. प्रकाश मराठेकाका (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत मंत्रपठणासाठी गेलो होतो. मंत्रपठणानंतर मी क्षमायाचना केली. (मंत्रपठणात काही चुका झाल्या असल्यास किंवा उच्चार करतांना चढ-उतार झाल्यास मी क्षमायाचना करतो.) त्यानंतर माझा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी पुढील संवाद झाला.
परात्पर गुरु डॉ. आठवले : कर्नाटकात सर्वजण क्षमायाचना करतात का ?
मी : हो, करतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तू आता क्षमायाचना का केलीस ?
मी : पठण करतांना काही चूक झाली असेल म्हणून.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तसे झाले का ?
मी : नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मग क्षमायाचना का केली ?
मी : कधी उच्चार करतांना एका लयीत होत नाहीत. (स्वर वर-खाली होतो म्हणून.)
परात्पर गुरु डॉ. आठवले : तसे झाले का ?
मी : नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मग क्षमायाचना का केलीस ?
यानंतर मी काहीच न बोलता शांत उभा होतो. नंतर ते मला म्हणाले, ‘‘ज्या वेळी चूक होते, तेव्हाच क्षमायाचना करावी. चूक झाली नसेल, तर क्षमा मागण्याची आवश्यकता नाही. उगाच क्षमा मागितल्यास त्याला काही अर्थ रहात नाही आणि त्याचे महत्त्व न्यून होते. जेव्हा चूक होत नाही, तेव्हा देवाला प्रार्थना करावी, ‘देवा तूच अजून चांगले करवून घे.’’
– श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०१९)