परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या साधकाची त्यांच्याशी झालेली भावस्पर्शी प्रथम भेट आणि अनुभवलेली त्यांची प्रीती !
वर्ष २००१ मध्ये मी सनातनच्या साधकांनी घेतलेल्या प्रवचनाला गेलो आणि सनातनमय झालो. गावातील प्रवचने, सत्संग यांचा लाभ होत असला, तरी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची व्याकुळता होती. मी अनुभवलेले गुरुदेवांचे प्रथम दर्शन आणि त्यांची अनुभवलेली प्रीती यांविषयी येथे देत आहे.
१. कोल्हापूर येथे प्रथमोपचार शिबिरासाठी जातांना मध्ये मिरज आश्रमात गेल्यावर परात्पर गुरुदेव तेथेच असल्याचे समजणे आणि त्यांच्या भेटीसाठी मन व्याकुळ होणे
वर्ष २००३ मध्ये कोल्हापूर येथील प्रथमोपचार शिबिरासाठी माझी निवड झाली. आमच्या जिल्ह्यातून मी आणि कु. गायत्री जाधव (आताच्या सौ. गायत्री शास्त्री) मिरजेला आलो. तेव्हा परात्पर गुरुदेव मिरज आश्रमात होते. त्या वेळी ‘एकदा परात्पर गुरुदेव मला भेटायला हवेत. ते मला पाठमोरे दिसले, तरी चालतील; पण मला परात्पर गुरुदेवांना एकदा पहायचेच आहे’, असे मला सतत वाटत होते. मी मिरज येथे आल्यावर माझी ही व्याकुळता पुष्कळ वाढली होती.
२. ‘शिबिरार्थींनी दुसर्या ठिकाणी निवासाला जायचे आहे’, हे समजल्यावर कशातही लक्ष न लागणे आणि ‘परात्पर गुरुदेवांना पहायचे आहे’, या ध्यासाने मन व्याकुळ होणे
मला ‘शिबिरार्थींनी लवकर जेवण करून अन्यत्र निवासाला जायचे आहे आणि सकाळी लवकर उठून कोल्हापूरला जाण्यासाठी निघायचे आहे’, असा निरोप समजला. माझे कशातही लक्ष लागत नव्हते. मी पटकन २ घास खाल्ले. ‘परात्पर गुरुदेवांना पहायचे आहे’, हा एकच ध्यास मला लागला होता. मी अक्षरश: वेडा झालो होतो.
३. परात्पर गुरुदेवांची खोली दिसल्यावर डोळे आपोआप मिटून भावपूर्ण आत्मनिवेदन करणे आणि डोळे उघडून पाहिल्यावर समोरच परात्पर गुरुमाऊली उभी असलेली दिसणे
मी माझ्याच विचारांत आश्रमातील भोजनकक्षातून पायर्या चढून आलो. समोरच मला परात्पर गुरुदेवांची खोली दिसली. त्या खोलीचा दरवाजा बंद होता. माझे डोळे आपोआप मिटले गेले आणि हात जोडले गेले. मी परात्पर गुरुदेवांना (मनातून) म्हणालो, ‘गुरुदेवा, मला तुम्हाला एकदा पहायचे आहे. आता मी कोल्हापूरला जाणार आणि तिकडून तसाच माझ्या गावी जाणार. गुरुदेवा, केवळ एकदा मला दर्शन द्या.’ त्या वेळी माझी व्याकुळता वाढली होती. तेवढ्यातच काहीतरी आवाज आल्यामुळे मी भानावर आलो आणि डोळे उघडून पहातो, तर काय ! माझी कृपाळू गुरुमाऊली खोलीचे दार उघडून माझ्यासमोर उभी होती आणि स्नेहमय नेत्रांनी माझ्याकडे पहात हसत होती. गुरुमाऊलीला पाहून मी आनंदाने ओरडलो, ‘‘परम पूज्य डॉक्टर ! परम पूज्य डॉक्टर !’’
आता माझ्या आनंदाला पारावार नव्हता. माझा केवळ एकच जप चालू होता, ‘परम पूज्य डॉक्टर…! परम पूज्य डॉक्टर..!’
४. परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर ‘त्यांची आणि माझी अनंत जन्मांची साथ आहे’, याची जाणीव होणे
श्रीविष्णुस्वरूप गुरुदेव जणू मला विचारत होते, ‘अरे, तुम्ही कुठे होतात ?’ त्यांच्या एका दृष्टीक्षेपाने परात्पर गुरुदेवांनी ‘माझी आणि त्यांची अनंत जन्मांची साथ आहे अन् प्रत्येक जन्मी मी त्यांच्यासमवेत आहे’, याची मला जाणीव करून दिली. गोरेपान, उंच आणि अत्यंत सुंदर असे परात्पर गुरुदेवांचे रूप मी माझ्या डोळ्यांत साठवत होतो. त्या वेळी आमचे पुढील संभाषण झाले.
मी : परम पूज्य डॉक्टर, मी धन्य झालो. मला तुम्हाला एकदा पहायचे होते. तुम्ही माझ्या हाकेला धावून आलात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मला काय पहायचे ?
(माझ्या आवाजाने बाजूच्या खोलीतील अन्य साधक बाहेर आले, तेव्हा त्यांना उद्देशून)
परात्पर गुरु डॉ. आठवले : यांना थोडे पाणी द्या.
(मी परात्पर गुरुदेवांच्या खोलीतील दरवाजाच्या शेजारी असलेल्या बाकावर बसलो. परात्पर गुरुदेव माझ्यासमोर उभे होते.)
परात्पर गुरु डॉ. आठवले : सूक्ष्मातील मोठे युद्ध चालू आहे; पण विजय आपलाच आहे. काही काळजी करायला नको. सर्व काही चांगले होणार आहे.
त्यानंतर परात्पर गुरुदेवांनी माझी विचारपूस केली आणि शिबिराविषयी विचारले. नंतर मी आनंदाने निवासस्थानी गेलो.
५. कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, माझी कोणतीही पात्रता आणि साधना नसतांना तुम्ही मला दर्शन दिले. मी अभागी असतांना तुम्ही मला आपलेसे केलेत. त्याबद्दल मी आपला कोटीशः कृतज्ञ आहे. या प्रसंगाच्या निमित्ताने एका नाट्यगीताच्या ४ ओळींत थोडा पालट करून श्रीचरणी अर्पण करतो,
‘प्रथम तुज पाहता जीव वेडावला ।
उचलूनी घेतले निजरथी तू मला ।।’
– आधुनिक वैद्य श्रीपाद व्यंकटेश पेठकर, पंढरपूर (३.६.२०१८)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |