राष्ट्रीय पत्रकार संघाकडून ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आणि वीणाताई गावडे ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित !
मुंबई – पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करून समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात हातभार लावावा. कुणाचेही जीवन उद्ध्वस्त होईल, कुणाचेही चारित्र्य हनन होईल, अशी पत्रकारिता करू नका, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी केले. राष्ट्रीय पत्रकार संघाच्या (नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स) वतीने पहिल्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराने योगेश त्रिवेदी आणि जनसंपर्क क्षेत्रात प्रदीर्घ कार्य करणार्या वीणाताई गावडे यांना सन्मानित करण्यात आले. ‘एन्युजे’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात पार पडलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक नीलेश खरे आणि मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभात बोलतांना योगेश त्रिवेदी यांनी वरील आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे खासदार संजय राऊत होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
या वेळी योगेश त्रिवेदी म्हणाले, ‘‘पत्रकाराने बातमीमध्ये ‘बात’ आणि ‘मी’ असे न करता बातमी करावी’, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आणि दैनिक ‘सामना’चे संस्थापक संपादक बाळासाहेब ठाकरे आवर्जून सांगत असत. पत्रकार बातमीने कोणकोणती किमया घडवून आणू शकतो, याचे उदाहरण म्हणजे दैनिक ‘सामना’मधील एका बातमीने महाराष्ट्र विधानभवनात ‘वेलकम टू विधानभवन’ चा ‘नमस्कार विधानभवन’, असा फलक करण्यात आला. दुसरे उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची व्याख्या मुंबई उच्च न्यायालयात सादर केली. ती सर्वोच्च न्यायालयात ग्राह्य धरण्यात आली. डॉ. मनोहर जोशी यांची ११ डिसेंबर १९९५ या दिवशी हिंदुत्वाविषयीच्या एका खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.’’
या वेळी खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणात पत्रकारांनी राज्य आणि देश पातळीवर इतिहास घडवला असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्षा शीतल करदेकर यांनी केले.