पुणे येथील मायलेकींच्या मृत्यूनंतर २९ वर्षांनी न्याय !
पुणे – २९ वर्षांपूर्वी म्हणजे ९ ऑक्टोबर १९९२ या दिवशी पुण्यातील जनाबाई कलाटकर या महिलेने पती रामदास कलाटकर याच्या त्रासाला कंटाळून आपल्या अल्पवयीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पीडित महिलेच्या आत्महत्येनंतर २९ वर्षांनी आरोपी पतीला दोषी ठरवून ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा दिली आहे.
पती, सासू-सासरे आणि भारती नावाची अन्य महिला जिच्यासह रामदास कलाटकर रहात होता. हे सर्व पीडित जनाबाई यांना मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायचे. शेवटी आरोपींच्या त्रासाला कंटाळून जनाबाई यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने पतीला ३ वर्षांचा सश्रम कारावास सुनावला, तर भारती नावाच्या महिलेला ६ मासांचा साधा कारावास सुनावला होता. यानंतर दोन्ही आरोपींनी पुणे सत्र न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर सुनावणी केल्यानंतर घटनेच्या २९ वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाने पुणे सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. न्यायालयाने दोषी पतीची कारागृहात रवानगी केली आहे; पण या सुनावणी दरम्यान काही वर्षांपूर्वी पीडितेच्या सासूचे तसेच भारती नावाच्या महिलेचेही निधन झाले आहे.