सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू ! – धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर
राष्ट्रकार्य आणि धर्मकार्य करणार्या सनातन संस्थेच्या पाठीशी उभे रहाणारे धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर यांचे आभार !
नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री, तसेच अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक हे सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. भविष्यात सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू, अशी चेतावणी धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
त्या पत्रकात पुढे म्हटले आहे …
१. छगन भुजबळ हे विद्यमान सरकारमध्ये मंत्री असून ते पूर्वी शिवसेनेचे आमदार होते. त्या वेळी ते हिंदुत्वाची बाजू पोटतिडकीने मांडत; परंतु नंतर पैसा, सत्ता, राजकारण याला महत्त्व दिल्याने आणि हिंदुत्व सोडल्याने प्रसंगी त्यांना कारागृहवासही भोगावे लागला. नंतर कारागृहातून सुटताच त्यांनी जाहीररित्या मनुस्मृति जाळण्याचे समर्थन केले आणि त्याच्या प्रती जाळल्या. त्यामुळेच आम्ही वैकुंठवासी गुरुवर्य ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्तेबाबा यांच्या आदेशानुसार जालना तालुका पोलीस ठाणे, विदर्भातील पोलीस ठाणे नरखेड आणि काटोल पोलीस ठाणे येथे छगन भुजबळ यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानुसार २५ डिसेंबर २०१८ या दिवशी नोंद झालेल्या तक्रारीवर अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने आम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे दाद मागणार आहोत.
२. छगन भुजबळ हे सनातन संस्थेसारख्या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनेवर बंदीची मागणी करतात, हे दुर्दैवी असून हिंदु धर्मामध्ये असंतोष निर्माण करण्याचे पाप ते करत आहेत.
३. रझा अकादमी, कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम, हिंदु धर्माच्या विरोधात सातत्याने बोलणारे आणि पसार असणारे झाकीर नाईक, तबलिगी जमात, अशा राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्वेषी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भुजबळ यांच्यासारखे करत नाहीत.
४. छगन भुजबळ हे त्यांच्या मंत्रीपदाचा हिंदु संघटनांवर दबाव टाकण्यासाठी दुरुपयोग करत असल्याने आम्ही शासनाकडे त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी मागणी करणार आहोत.