देहली येथील सनातनचे संत पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्याविषयी संतांनी व्यक्त केलेले मनोगत अन् त्यांच्या संतत्वाविषयी संत आणि साधक यांना मिळालेल्या पूर्वसूचना !
२३ डिसेंबर २०२१ या दिवशी देहली येथील पू. संजीव कुमार (वय ७० वर्षे) आणि पू. (सौ.) माला संजीव कुमार (वय ६७ वर्षे) या दोन संतरत्नांची अनमोल भेट सनातनच्या साधकांना लाभली.
पू. संजीव कुमार हे देहली येथील यशस्वी उद्योजक आहेत. त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीयही वर्ष १९९९ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत. २६ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या अंकात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी संतपदी विराजमान झालेल्या कुमार दांपत्याविषयी काढलेले गौरवोद्गार, संतपदी विराजमान झाल्यानंतर कुमार दांपत्याने व्यक्त केलेले हृद्य मनोगत आणि पू. संजीव कुमार यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत पाहिले. आज पू. संजीव कुमार यांच्याविषयी संतांनी व्यक्त केलेले मनोगत, तसेच त्यांच्या संतत्वाविषयी संत आणि साधक यांना मिळालेल्या पूर्वसूचना येथे देत आहोत.
पू. संजीवभैय्या माझे साधनेतील प्रारंभीचे मार्गदर्शक गुरु ! – सनातनचे संत पू. प्रदीप खेमका, झारखंड
मला सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी जोडणारे पू. संजीवभैय्याच आहेत. वर्ष १९९९ मध्ये ते मला आग्रहाने सनातनच्या सत्संगाला घेऊन गेले आणि तेथे कागदावर आधुनिक वैद्य औषधे लिहून देतात, त्याप्रमाणे (प्रिस्क्रीप्शनप्रमाणे) संजीवभैय्यांनी नामजप लिहून दिला. तेव्हापासून त्यांनी मला गुरूंच्या चरणांशी बसवले. मला असते वाटते की, ते माझे प्रारंभीच्या काळातील मार्गदर्शक गुरुच आहेत. आज ते संतपदी आरूढ झाल्याचे पाहून मला आनंद झाला. ते सतत कृतज्ञताभावात असतात. त्यांच्या बोलण्यातही सतत गुरूंचेच नाव असते. माझ्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक प्रवासात त्यांनी मला पुष्कळ साहाय्य केले आहे. माझा पूर्ण परिवार पू. संजीवभैय्यांमुळेच साधनेत आला. आज माझा आनंद गगनात मावत नाही. पू. मालादीदी यांचा आजच्या भावसोहळ्यातील संवाद अतिशय भावपूर्ण जाणवत होता. माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘त्या बोलत असतांना कृतज्ञतेची नदी वहात आहे’, असे वाटत होते.
अनेक दिवसांची प्रतीक्षा पूर्ण झाली ! – सनातनच्या संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका, झारखंड
मला या आनंदाच्या क्षणाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. माझ्या साधनेच्या आरंभीच्या काळात पू. संजीवभैय्या यांनी नामजप करण्यासाठी मला वारंवार प्रेरित केले. आज दोघे पती-पत्नी संतपदी पोचल्याचे ऐकून मला अत्यंत कृतज्ञता वाटत आहे. ‘आम्ही आनंदाच्या सागरातच आहोत’, असे वाटत आहे.
पू. प्रदीप खेमका आणि पू. (सौ.) सुनीता खेमका हे संत सन्मान सोहळ्याला संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून जोडले होते.
कर्तेपणा न घेणारे पू. संजीव कुमार आणि त्यांच्या संतत्वाचे रहस्य उलगडणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !
‘पू. संजीव कुमार स्वत:चा सन्मान सोहळा त्रयस्थपणे अनुभवत आहेत’, असे जाणवत होते. त्यांच्या बोलण्यातूनही त्यांच्यातील अल्प अहं लक्षात येत होता. पू. संजीवभैय्या म्हणाले, ‘‘ईश्वर निर्गुण आहे. तो कसे कार्य करतो, याची अनुभूती ईश्वर या सोहळ्याच्या माध्यमातून देत आहे. सर्व साधकांनी ‘आम्हाला पाहून काय वाटले’, हे व्यक्त केले. या अनुभूती ईश्वरच देत आहे. ईश्वराच्या या नियोजनाविषयी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होत आहे. माझीतर काहीच पात्रता नाही.’’
याविषयी सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘मी सामान्य साधक आहे’, असे पू. संजीवभैय्या यांनी सांगितले. यातूनच सहजता आणि अल्प अहं ही त्यांची गुणवैशिष्ट्ये दिसून येतात. ‘माझी पात्रता नाही’, ‘माझ्यात किती त्रुटी आहेत’, ‘मी ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतांना किती कमी पडतो’, असे चिंतन चालू होणे’, ही संतत्वाचा आरंभ होत असल्याची लक्षणे आहेत. ‘मी कुणीतरी आहे’, हा विचार जेव्हा समाप्त होतो, तेव्हाच आपण संतत्वासाठी पात्र होतो. साधकाचे साधनेचे सर्व स्तरांवरील प्रयत्न यथाशक्ती होत असतात; मात्र नंतर जेव्हा स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीविषयी विचार किंवा काळजी नसते; तेव्हा त्या साधकाची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू होते.
सनातनच्या संतांचे हे वैशिष्ट्य आहे की, संत घोषित झाल्यानंतरही त्यांचे वर्तन साधक अथवा शिष्याप्रमाणे असते. ते संत म्हणून स्वतःचे वेगळेपण जपत नाहीत. ते सर्वांमध्ये मिळून मिसळून वागतात.
– श्री. आनंद जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.
पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या संतत्वाविषयी संत आणि साधक यांना मिळालेल्या पूर्वसूचना
अ. ‘गेल्या ५ दिवसांपासून मला पू. संजीवभैय्या यांच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा होत होती. आजच दुपारी १ वाजता त्यांच्याशी बोलणे झाले. त्या वेळी सहज बोलतांनाही त्यांचा कृतज्ञताभावच जागृत होत होता. त्यांचा संत म्हणून सन्मान झाला, तेव्हा माझ्या लक्षात आले की, त्यांच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा का होत होती.’- पू. प्रदीप खेमका
आ. ‘या सोहळ्याच्या आयोजनाविषयी मला उत्तरदायी साधकांनी सांगितले. त्यानंतर काही कारणांसाठी मी गच्चीवर गेले, तर सेवाकेंद्राच्या आसपास ८-१० मोर आनंदाने नाचत असल्याचे आनंददायी दृश्य मला दिसले. यातून ‘संतांच्या स्वागतासाठी सृष्टीही कसा प्रतिसाद देते’, हे लक्षात आले.’- कु. मनीषा माहूर, देहली सेवाकेंद्र
इ. ‘या सोहळ्याच्या आयोजनाच्या सत्संगाच्या दिवशी आमच्या गाडीसमोरून नील गाय गेली आणि साधकांना २ पोपटही दिसले. ‘हा शुभसंकेत आहे’, असे वाटले.’- श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), देहली सेवाकेंद्र
ई. ‘सोहळ्याच्या पूर्वी संजीवभैय्या आणि मालादीदी यांना नमस्कार करण्याचा तीव्र विचार येत होता आणि मी त्यांच्या पाया पडले. नंतर सोहळ्यात त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हा माझ्याकडून अशी कृती होण्यामागील कारण कळले.’
– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र