श्रीरामाचा विशिष्ट संख्येने जप पूर्ण केल्यावर प.पू. दास महाराज यांना झालेले मारुतीचे दर्शन आणि प.पू. भगवानदास महाराज अन् पू. रुक्मिणीआई यांनी १३ कोटी श्रीरामनाम जप पूर्ण केल्यावर झालेले उद्यापन !

२५.१२.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात आपण ‘प.पू. दास महाराज यांचे बालपणीचे सात्त्विक खेळ, तसेच त्यांच्यातील आध्यात्मिक वैशिष्ट्ये’ यांविषयी पाहिले. आजच्या अंकात ‘प.पू. दास महाराज यांनी रामनामाचा विशिष्ट संख्येने जप केल्यानंतर त्यांना मारुतीचे दर्शन होणे, प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी १३ कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यानंतर भगवान श्रीधरस्वामींच्या कृपेने झालेले उद्यापन अन् पू. रुक्मिणीआईंच्या प्रार्थनेचे सामर्थ्य’ यांविषयी पाहूया.

(भाग ६)

मागील भाग पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/537993.html


प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

७. रघुवीरला (प.पू. दास महाराज यांना) सज्जनगडावर झालेले भगवान श्रीधरस्वामींचे दर्शन !

७ अ. प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी रघुवीरच्या खोड्यांविषयी श्रीधरस्वामींना सांगितल्यावर त्यांनी ‘हा १५ वर्षांचा झाल्यावर शांत होईल’, असे सांगणे : ‘मी पुष्कळ खोड्या करत असल्याने प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई मला सज्जनगडावर श्रीधरस्वामींकडे घेऊन गेले होते. त्या वेळी प.पू. भगवानदास महाराज यांनी भगवान श्रीधरस्वामींना सांगितले, ‘‘आमचा हा मुलगा (रघुवीर) पुष्कळ खोड्या करतो.’’ तेव्हा भगवान श्रीधरस्वामींनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, ‘‘किती गोजिरवाणे पोर आहे ! हे पोर धर्मकार्यासाठी जन्माला आले आहे. हा मारुतीचा अंशावतार आहे. याला वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत काही म्हणू नका. हा असाच खोडकर रहाणार. १५ वर्षांचा झाल्यावर हा शांत होईल.’’ तेव्हा मी १३ वर्षांचा होतो.

७ आ. भगवान श्रीधरस्वामींनी रघुवीरला उपासना सांगून पादुका देणे : त्या वेळी भगवान श्रीधरस्वामींनी मला उपासना सांगितली आणि पादुका दिल्या. आता त्या पादुका बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील आश्रमात देवघरात आहेत. भगवान श्रीधरस्वामींनी मला प्रतिदिन १३ माळा रामनामाचा जप आणि दासबोधाचे पारायण करण्यास सांगितले.

८. मानससरोवर येथे जाऊन रामनामाचा १ कोटी, ११ लाख, ११ सहस्र, १११ नामजप पूर्ण केल्यावर रघुवीरला मारुतीचे दर्शन होणे

त्या वेळी मी भगवान श्रीधरस्वामींना विचारले होते, ‘‘मारुति कुठे असतो ? तो दिसतो का ? भेटतो का ? रामराया किती वर्षे उभे आहेत ? त्यांना बसवायचे आहे. ते बसतील का ?’’ त्यावर स्वामी म्हणाले, ‘‘मारुति भेटतो. त्यासाठी मानससरोवर येथे जाऊन नामजप करावा लागेल. रामराया तुझ्याकडे येऊन बसतील.’’ हे माझ्या लक्षात राहिले होते.

तेच लक्षात ठेवून वर्ष १९६२ मध्ये मी बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथून कुणालाही न सांगता मानससरोवर येथे पळून गेलो. तेथे ब्रह्मचैतन्य गाेंदवलेकर महाराजांचे शिष्य जाधव महाराज आणि मी, आम्ही दोघांनी मिळून रामनामाचा १ कोटी, ११ लाख, ११ सहस्र, १११ नामजप पूर्ण केला. त्यासाठी आम्हाला १ वर्ष लागले. नामजप पूर्ण झाल्यानंतर आम्हाला मारुतीचे दर्शन घडले.

९. प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी १३ कोटी श्रीरामनाम जप पूर्ण झाल्यावर केलेले नामजपाचे उद्यापन !

९ अ. भगवान श्रीधरस्वामींनी ‘मी नामजपाच्या उद्यापनाला येईन, सर्व सोय मी करीन’, असे सांगणे आणि त्याप्रमाणे त्यांनी उद्यापनाला येणे : प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी १५ वर्षांत १३ कोटी श्रीरामनाम जप पूर्ण केला. नामजपाचे उद्यापन वर्ष १९५२ मध्ये रामनवमीच्या दिवशी करायचे ठरले. प्रतिवर्षी महाराज भिक्षा मागून रामनवमी साजरी करायचे; पण उद्यापनाच्या वेळी भगवान श्रीधरस्वामींनी महाराजांना सांगितले, ‘‘मी नामजपाच्या उद्यापनाला तुझ्याकडे येईन. तू भिक्षा मागू नकोस. उद्यापनाची सर्व सोय मीच करीन.’’ त्याप्रमाणे भगवान श्रीधरस्वामी रामनामाच्या उद्यापनासाठी गळदग्याची वाडी (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथे आले होते.

९ आ. भगवान श्रीधरस्वामींनी अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या लोकांच्या त्रासाचे निवारण करणे : उद्यापनाच्या वेळी स्वामींच्या दर्शनासाठी सहस्रो लोक जमले होते. तेथे अनिष्ट शक्तींचा त्रास असलेले लोक त्रासाच्या निवारणासाठी आले होते. पू. रुक्मिणीआईचा एक भाऊही दत्तवाड (जिल्हा कोल्हापूर) येथून आला होता. त्याला आकडी (फीट) येत असे. त्याला श्रीधरस्वामींना दाखवण्यासाठी आणले होते. स्वामींनी त्रास असलेल्या लोकांच्या त्रासाचे निवारण केले.

९ इ. अनुभूती

बुंदी संपत आल्यावर श्रीधरस्वामींनी बुंदीवर छाटी टाकणे, अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करून मंत्र म्हणणे आणि नंतर छाटी काढल्यावर तेथे खोली भरून बुंदी असणे : कार्यक्रमासाठी खोली भरून बुंदी बनवली होती. बरेच लोक जेवून गेल्यावर बुंदी संपत आली. त्या वेळी अकस्मात् महाविद्यालयाची मुले आली. लोक म्हणाले, ‘‘आता काय करायचे ?’’ श्रीधरस्वामी म्हणाले, ‘‘बुंदीवर छाटी (अंगावर पांघरण्याची शाल) टाका.’’ बुंदीवर छाटी टाकल्यानंतर श्रीधरस्वामींनी अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करून मंत्र म्हटला आणि छाटीवर फुंकर मारली. नंतर छाटी काढल्यावर तेथे खोली भरून बुंदी होती. ही पुष्कळ मोठी अनुभूती होती. सहस्रो लोक जेवून गेले, तरी कशाचीही न्यूनता पडली नाही.

प.पू. भगवानदास महाराज आणि प.पू. रुक्मिणीबाई

१०. पू. रुक्मिणीआईंच्या प्रार्थनेचे अनुभवलेले सामर्थ्य !

१० अ. घराच्या छपरावर चढलेल्या चोराने पू. रुक्मिणीआईच्या पायावर मोठा नाग असल्याचे पहाणे आणि तो घाबरून पळून जाणे : एकदा रात्री एक अट्टल चोर घराच्या छपरावर चढला. छपरावर नारळाची झाप (झावळी) घातली होती. चोर झाप बाजूला करून खाली पहातो, तर काय ? आईच्या पायावर मोठा नाग होता. तो फणा काढून बसला होता. आईच्या समवेत एक लहान मुलगा होता. तो झोपला होता. त्या चोराने तो नाग पाहिला. तेव्हा तो चोर इतका घाबरला की, त्याने जागीच मल-मूत्र विसर्जन केले आणि तो तेथून पळून गेला.

१० आ. जाग आल्यावर आईला नाग दिसणे, तिने नागाला ‘तुझे हे रूप सौम्य कर’, अशी प्रार्थना केल्यावर तो भगवान श्रीधरस्वामींच्या पादुकांच्या ठिकाणी जाऊन अदृश्य होणे : आईला पहाटे ४ वाजता जाग आली. तेव्हा आईच्या पायाला गार गार जाणवू लागले. तिला ते जड लागत होते. आईने डोळे उघडून पाहिले, तर तिच्या पायावर मोठा नाग होता आणि तो फणा काढून तिच्याकडे पहात होता. आईने हात जोडून त्याला प्रार्थना केली, ‘बाबा, तू कोण आहेस ? तू अंतर्धान पाव. तुझे हे रूप मला बघवत नाही. भगवंता, तुझे हे रूप सौम्य कर.’ मग तो नाग भगवान श्रीधरस्वामींच्या पादुकांच्या ठिकाणी जाऊन अदृश्य झाला.

१० इ. सकाळी नागदेवतेमुळे आश्रमात सुगंध पसरणे : मी सकाळी आश्रमात आलो. त्या चोराने मल-मूत्र विसर्जन केले असल्याने आश्रमाबाहेर दुर्गंधी पसरली होती; पण आतमध्ये नागदेवतेमुळे सुगंध पसरला होता.

१० ई. चोरीसाठी आलेला कुप्रसिद्ध अट्टल चोर होता. शेवटी त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि तो मेला.’(क्रमशः)

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (२.११.२०२०)