हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांनी ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या घेतलेल्या भेटीचा वृत्तांत !

ठाणे, २६ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली. या वेळी राष्ट्र-धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली. यासंदर्भात मिळालेला प्रतिसादाचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत.

ईशनिंदा विरोधी कायदा होण्यासाठी सरकारकडे मागणी करणार ! – शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ

अंबरनाथ येथील शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याशी चर्चा करतांना सुनील घनवट आणि समितीचे शिष्टमंडळ

देवता आणि हिंदु धर्म यांची टिंगलटवाळी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. हे आघात थांबवण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा व्हायला हवा. यासाठी मी सरकारकडे मागणी करणार आहे, असे विधान अंबरनाथ येथील शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केले. ‘विशाळगडावरील अतिक्रमण’ हा विषय ऐकल्यावर ‘यासंदर्भात आवश्यक कारवाई व्हायला पाहिजे’, असे सांगत ‘हिंदु संस्कृतीचे महत्त्व प्रत्येकापर्यंत पोचले पाहिजे’, असेही ते म्हणाले.

त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांच्यासह समितीचे श्री. सुनील कदम, श्री. वीरेश अहिर आणि अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.

आदिवासी पाड्यांमध्ये धर्मजागृतीचे कार्य करणे आवश्यक ! – भाजपचे आमदार किसन कथोरे, मुरबाड

मुरबाड मतदारसंघातील भाजपचे आमदार किसन कथोरे यांना सनातन पंचाग २०२२ भेट देतांना सुनील घनवट आणि सुनील कदम

मुरबाड मतदारसंघातील भाजपचे आमदार किसन कथोरे यांची हिंदु जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट यांनी भेट घेतली असता आदिवासी पाड्यांमध्ये हिंदूंमध्ये धर्माविषयी जागृती करणे आवश्यक असल्याचे मत आमदार कथोरे यांनी व्यक्त केले. या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.

धर्मजागृतीच्या कार्यात संघटितपणे कार्य करूया ! – हरेश पष्टे, माजी नगरसेवक आणि ‘जिजाऊ ब्रिगेड’चे बदलापूर अध्यक्ष

माजी नगरसेवक हरेश पष्टे यांना सनातन पंचांग भेट देतांना श्री. सुनील घनवट आणि अन्य धर्मप्रेमी कार्यकर्ते

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि ‘जिजाऊ ब्रिगेड’चे बदलापूर येथील अध्यक्ष हरेश पष्टे म्हणाले, ‘‘हलाल प्रमाणपत्र’ आणि गडकिल्ल्यांवर होणारी अतिक्रमणे यांसंदर्भात जागृती करायला हवी. धर्मजागृतीच्या कार्यात यापुढेही संघटितपणे कार्य करूया.’’ या वेळी तेथे उपस्थित असणार्‍या ६ धर्मप्रेमींनी विषय समजून घेतला.

‘हलाल प्रमाणपत्र’ हा विषय गंभीर आहे ! – राजेश मोरे, माजी सभागृह नेते आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

हलाल प्रमाणपत्र आणि गडकिल्ल्यांवर होणारे अतिक्रमण हे दोन्ही विषय गंभीर असून याविषयी लोकांमध्ये जागृती करायला हवी. आपण ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी व्यापार्‍यांची बैठक घेऊन जागृती करूया.

‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी व्यापार्‍यांची बैठक घेणार ! – संजय मोरे, भाजप मंडल अध्यक्ष, कल्याण (पूर्व)

संजय मोरे, भाजप मंडल अध्यक्ष यांना सनातन पंचांग भेट देतांना श्री. सुनील घनवट

हिंदूंवरील आघात ही चिंतेची गोष्ट असून हिंदूंचे संघटन व्हायला पाहिजे. ‘हलाल प्रमाणपत्र’ हा विषय प्रत्येक व्यापार्‍यापर्यंत पोचण्यासाठी त्यांची बैठक घेऊ, असे कल्याण येथील भाजपचे मंडल अध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले. या वेळी त्यांनाही ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.