बीडमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या सूचीत २ जिवंत व्यक्तींच्या नावांचा समावेश
अशा चुका होतातच कशा ? यातून नेमका मृत्यू कुणाचा झाला, हे कसे कळणार ? ही चूक कुणाकडून झालेली आहे, त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. – संपादकीय
बीड – येथे कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्यांच्या सूचीमध्ये २ जिवंत व्यक्तींची नावे घेण्यात आली आहेत. हा निष्काळजीपणा आहे कि घोटाळा आहे, याविषयी चौकशी चालू आहे. राज्य सरकारने कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० सहस्र रुपयांची हानी भरपाई घोषित केली आहे. यानिमित्ताने सिद्ध करण्यात येणार्या सूचीमध्ये हा निष्काळजीपणा झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (प्रशासनाचा भोंगळ कारभार ! ‘या माध्यमातूनही भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे’, असे सर्वसामान्य जनतेला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)
अंबाजोगाई नगर परिषदेचे तहसीलदार विपीन पाटील म्हणाले की, कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या सूचीत एका सामाजिक कार्यकर्त्यासह अन्य एका व्यक्तीचे नाव असल्याचे निदर्शनास आले आहे. हे दोघेही जिवंत असून त्यांची नावे मृतांच्या सूचीमध्ये कशी आली ? याचे अन्वेषण चालू आहे. आम्ही ही सूची पडताळणीसाठी नगर परिषद आणि ग्रामपंचायत यांच्याकडे पाठवली आहे. चुका दुरुस्त करून अंतिम सूची सिद्ध केली जाईल.