हिमंत बिस्व सरमा यांची हिंमत !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी आसाममध्ये प्राण्यांविषयीच्या एका कायद्यामध्ये सुधारणा करणारे एक विधेयक संमत केले आहे. या विधेयकामुळे गोतस्करांच्या घरात प्रवेश करून शोध घेणे, गोतस्कराने गत ६ वर्षांत अवैध पशू व्यापारातून मिळवलेली संपत्ती जप्त करणे असे अधिकार पोलिसांना मिळाले आहेत. या विधेयकामुळे गोतस्करांच्या वाहनांचा लिलाव करता येणार आहे. हिमंत बिस्व सरमा यांनी हा अतिशय धाडसी निर्णय घेतला आहे, असेच म्हणावे लागेल. भारतात गोतस्करीचे प्रमाण पुष्कळ आहे. विशेषत: सीमेवरील बंगाल, आसाम येथून बांगलादेशमध्ये गायींची तस्करी केली जाते. भारत-बांगलादेशाच्या सीमेवर असलेले कुंपण ओलांडून गायींना सीमेपलीकडे पाठवता येण्यासाठी विशिष्ट प्रकारचे झुले सिद्ध करून त्याद्वारे गायींना पाठवले जाते. त्याचप्रमाणे नदी आणि ओढे यांच्या पात्रात गायींना ढकलून देऊन, पाण्यातूनच त्यांना सीमेपलीकडे पाठवले जाते. आसामच्या सीमावर्ती भागात बर्याच वेळा गोतस्कर आणि सीमा क्षेत्रातील सैनिक यांच्यात चकमकी होतात. १ डिसेंबर २०१९ ते ३० नोव्हेंबर २०२० या एका वर्षात सीमा सुरक्षा दलाकडून २४ सहस्र ६० गायींची सुटका करण्यात आली आहे. यावरुन गोतस्करीच्या समस्येची भीषणता किती आहे ? याची कल्पना येते.
गायीविषयी घेतलेले धडाडीचे निर्णय
काही वेळा गोरक्षक आणि गोतस्कर यांच्यात हाणामारी होऊन गोरक्षकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. परिणामी हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आसाममधून बंगालमध्येही गायींची तस्करी होते. जुलै मासात सरमा यांनी ‘गाय ही आमची माता असल्याने तिची तस्करी करणार्यांना सोडणार नाही’, असे विधान केले होते. त्याची कार्यवाहीच टप्प्याटप्प्याने त्यांनी चालू केली आहे. यापूर्वीच ऑगस्ट मासात प्राण्यांविषयीच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत केले होते. त्यानुसार हिंदु, शीख आणि जैन धर्मीय यांच्या प्रार्थनास्थळांपासून ५ किलोमीटरच्या परिसरात गोहत्या अन् गोमांस विक्री यांवर बंदी घातली होती. तसेच ‘हिंदू गायीची पूजा करतात. त्यामुळे ज्या ठिकाणी हिंदू रहातात, त्या ठिकाणी गोमांस वर्ज्य करण्यात यावे’, असे विधान त्यांनी या कायद्यातील सुधारणेच्या पूर्वी केले होते.
गोमातेच्या संदर्भात आसामचे मुख्यमंत्री सरमा उचलत असलेली पावले म्हणजे त्यांच्याकडून होत असलेले खरे गोरक्षण आहे. ते केवळ ‘गोरक्षण झाले पाहिजे, गाय आमची माता आहे’, असे बोलून न थांबता त्यांनी कृतीतून याचा प्रत्यय दिला आहे. सरमा खरेतर काँग्रेस पक्षातील आहेत; मात्र पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात झालेल्या एका प्रसंगातून त्यांना काँग्रेसचे खरे स्वरूप लक्षात आले आणि त्यांनी काँग्रेसचा त्याग करत भाजपमध्ये प्रवेश केला; मात्र भाजपमध्ये प्रवेश करून आणि आता आसामचे मुख्यमंत्री बनून त्यांनी निर्णयांचा जो काही धडाका लावला आहे, त्यावरून ते आधी काँग्रेसी होते, यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. एखाद्या हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्र्यांनाही जे निर्णय घेण्यास काही काळ लागेल, ते त्यांनी काही मासांतच घेतले आहेत. दोनच दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गायीविषयी बोलणे म्हणजे गुन्हा आहे, अशी सध्या देशात परिस्थिती आहे’, असे विधान केले होते. देशाच्या पंतप्रधानांनीच असे वक्तव्य करणे, यावरून त्यांच्यावरही गायीविषयी बोलण्यासाठी किती दबाव आहे ? हे लक्षात येते. अशा परिस्थितीत गायीविषयी निर्णय घेणे, कायदे करणे किती कठीण असेल ? महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा झाला आहे; मात्र तरी त्याची कार्यवाही परिणामकारक होत नसल्याने गोवंश हत्या होते, गोतस्करी होते, गोवंशाची अवैध वाहतूक होते. निर्णय घेण्यासमवेत अथवा कायदा लागू करण्यासमवेत त्याची प्रभावी कार्यवाही झाली, तर अपप्रकार रोखले जाऊ शकतात. ‘बलात्कार करणारा आरोपी पोलिसांच्या कचाट्यातून पळून जात असेल, तर पोलिसांना गोळीबार करावाच लागेल’, असे विधान सरमा यांनी काही मासांपूर्वी केले होते. यातून त्यांनी गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद ही नीतीच लागू पडते, हे अधोरेखित केले.
मदरसे बंद
यापूर्वी सरमा यांनी ७०० मदरसे बंद केले आहेत. तसेच ‘उर्वरित मदरशांचे वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय यांमध्ये रूपांतर करण्यात येईल’, असे सांगितले आहे. याविषयी त्यांनी ‘मला मुसलमान समाज मत देणार नाही आणि मी त्यांच्याकडे मत मागायलाही जाणार नाही; मात्र जेव्हा शैक्षणिक संस्थांमधून मुसलमान तरुण आधुनिक वैद्य, अभियंते बनून बाहेर पडतील, तेव्हा त्यांना माझा निर्णय योग्य असल्याचे लक्षात येईल’, असे विधान केले. यातून त्यांची तत्त्वनिष्ठताही प्रत्ययाला आली. काही दिवसांपूर्वी इस्लाम त्यागून हिंदु धर्म स्वीकारलेले जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांनी ‘मदरशातून आतंकवादी निर्माण होतात’, असे विधान करून खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या दृष्टीने ‘मदरशातून शिक्षण घेणारे आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी होतात, देशाशी एकनिष्ठ रहात नाहीत. त्यामुळे मदरशांवर बंदी घातली पाहिजे आणि तेथील शिक्षणात विज्ञान, गणित यांचा समावेश केला पाहिजे’, अशी मागणी केली होती. त्या मागणीची पूर्तता काही वर्षांनी सरमा करु धजावत आहेत.
सरमा यांच्या निर्णयांना विरोधी पक्ष आणि अन्य यांच्याकडून विरोध झाला; मात्र ते विरोधाला जुमानत नाहीत. स्वत: घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे तात्त्विकदृष्ट्या समर्थन ते करू शकतात आणि निर्णय कसा योग्य आहे ? हे वाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये हिरीरीने मांडू शकतात. प्रखर राष्ट्र आणि धर्म प्रेम, देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ, तत्त्वनिष्ठता, निर्णय घेण्याची धमक अन् भक्कम वैचारिक दृष्टिकोन स्पष्ट असेल, तर कोणताही निर्णय घेऊ शकतो, हे सरमा यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्यास हिंदू आणि भारत यांच्या अनेक समस्या सुटून हिंदु राष्ट्र मूर्त स्वरूपात येईल !