(म्हणे) ‘कुणीही तलवारीच्या जोरावर कुणाचे धर्मांतर करत नाही, तर चांगल्या कामांकडे पाहून लोक धर्मांतर करतात !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे विधान
|
उधमपूर (जम्मू-काश्मीर) – जे कुणी लोकांचे धर्मांतर करत आहेत ते तलवार वापरून, भीती दाखवून धर्मांतर करत नाहीत. एखाद्याचे चांगले काम आणि त्या धर्मातील व्यक्तींचे चारित्र्य इतरांना धर्मांतरित करण्यास प्रभावित करते. भेदभाव न करता मानवतेची सेवा करण्यास मिळावी, यासाठी एखाद्या विशिष्ट धर्मात लोक धर्मांतर करतात, असे फुकाचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी उधमपूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करतांना केले. कर्नाटकमध्ये संमत करण्यात आलेल्या धर्मांतरविरोधी विधेयकाविषयी ते बोलत होते.
Ghulam Nabi Azad waters down forced religious conversions, claims no one is forcing people to convert https://t.co/9Du3WR2Cl7
— OpIndia.com (@OpIndia_com) December 26, 2021
या विधेयकाला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला होता. ‘कोणत्याही व्यक्तीने चुकीचे वर्णन, बळजोरी, अवाजवी प्रभाव, प्रलोभन किंवा कोणत्याही फसव्या मार्गाने, विवाहाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने व्यक्तीचे एका धर्मातून दुसर्या धर्मात धर्मांतर करू नये किंवा धर्मांतर करण्याचा प्रयत्न करू नये किंवा कोणताही कट रचू नये’, असे विधेयकात नमूद केले आहे. यापूर्वी गुजरात विधानसभेने ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा, २०२१’ बहुमताने पारित केला होता. यामध्ये लग्नाच्या माध्यमातून सक्तीने धर्मांतर करणार्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यांनीही असा कायदा केला आहे.