येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण चालू होणार ! – पंतप्रधान मोदी यांची घोषणा

डावीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – कोरोना महामारीत लहान मुलांच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्या दिशेने आम्ही मोठे पाऊल टाकत आहोत. नवीन वर्षात पहिल्या सोमवारी अर्थात् ३ जानेवारीपासून आम्ही १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण चालू करत आहोत. कोविड योद्धे, ‘हेल्थकेअर वर्कर्स’ (रुग्णालयांमध्ये कार्य करणारे डॉक्टर, कर्मचारी आदी) आणि ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ (सामाजिक स्वास्थ्य, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा अशा अत्यावश्यक सेवांमध्ये कार्य करणारे कर्मचारी) यांना अधिक सुरक्षित करणे आवश्यक असून त्यांना १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिली आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ६० वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांना असलेला धोका लक्षात घेता त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने तिसरा डोस देण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभही १० जानेवारीपासूनच होणार आहे. ‘ओमिक्रॉन’चा धोका असला, तरी घाबरण्याचे कारण नाही. ‘सतर्कता बाळगा आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियम कटाक्षाने पाळा’, असे आवाहनही त्यांनी केले.