निवडणूक जवळ आल्यामुळेच सहानुभूती मिळवण्याचा खटाटोप ! – अशोक मोने, विरोधी पक्षनेते, सातारा नगरपालिका
सातारा, २६ डिसेंबर (वार्ता.) – साडेचार वर्षांत नगरपालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण निर्माण करून अक्षरश: लुटले. केवळ निविदा, देयके, टक्केवारी आणि पैसे खाणे ऐवढाच उद्योग नगरपालिकेमध्ये चालू होता. आता शेवटचे ५-६ मास उरल्यामुळे आम्ही किती कामे करतोय हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करून सातारावासियांची सहानुभूती मिळवण्याचा खटाटोप चालू आहे, अशी टीका सातारा नगरपालिकेचे विरोध पक्षनेते अशोक मोने यांनी केली.
अशोक मोने म्हणाले, ‘‘प्रशासकीय मान्यता नाही आणि निधीही उपलब्ध नाही, असे असूनही नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजनाचा घाट का घातला ? हे सूज्ञ सातारावासिय ओळखून आहेत. नूतन प्रशासकीय इमारतीचे काम करण्याएवढी पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. कोणत्या योजनेतून हे काम हाती घेतले हे कुणालाही सांगता येणार नाही, तसेच कोणत्याही शासकीय योजनेतून या कामाला अनुमती मिळालेली नाही. त्यामुळे केवळ सातारावासियांची दिशाभूल करून स्वार्थासाठी, सत्तेसाठी फसवणुकीचा उद्योग सत्ताधारी करत आहेत.