देशाला मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्याला लढायचे आहे ! – पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहासतज्ञ
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यातून संस्कृती, धर्म, राष्ट्र यांना स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी भारतावर राज्य केल्यानंतर भारताला पुन्हा शिवाजी महाराज यांचे स्मरण झाले. चिंचवडचे चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, लो. टिळक, सावरकर, भगतसिंग या सर्वांनी महाराज यांचे स्मरण करून स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि १५ ऑगस्ट १९४७ यावर्षी देशाला स्वराज्य मिळाले. देशाला स्वराज्य मिळाले; मात्र सुराज्य अजून मिळाले नाही. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्याला लढायचे आहे, असे उद्गार ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी काढले. श्रीमन्महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४६० व्या संजीवन समाधी महोत्सवाच्या तिसर्या दिवशी ‘हिंदवी स्वराज्याचे धार्मिक धोरण आणि श्री देव संस्थान’ या विषयावर ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी ते बोलत होते.
इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचा आढावा घेत सांगितले की, संस्कृतीला कालांतराने ग्लानी येते. अशा वेळेस एखादा सत्पुरुष, विद्वान, महापुरुष निर्माण होतो आणि त्या संस्कृतीचा जीर्णोद्धार करतो. पराभूत मानसिकतेतल्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुक्त केले. मोरया गोसावी यांचे चिरंजीव नारायण महाराज यांचे आशीर्वाद बालवयात छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतले होते. तुकोबा आणि रामदास यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन केले होते. भारताच्या इतिहासाचे विडंबन झाले आहे. ज्यांना भारतात हरवले त्यांची ओळख जगज्जेता म्हणून भारताच्या इतिहासात करून दिली जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.