तालुक्यातील एखाद्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी मामलेदारांना पाठवू नका !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शासकीय अधिकार्यांना सक्त ताकीद
पणजी, २५ डिसेंबर (वार्ता.) – तालुक्यातील एखाद्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी तालुक्याच्या मामलेदारांना पाठवू नका, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील उपजिल्हाधिकार्यांना दिली आहे. सांखळी येथे एका कार्यक्रमात मामलेदाराने त्यांची शासकीय कामे बाजूला ठेवून उपस्थिती लावल्याने मुख्यमंत्री संतापले. यासंबंधी एक चलचित्र (व्हिडिओ) सामाजिक माध्यमांत फिरत आहे. ही घटना २ दिवसांपूर्वीची असली, तरी हे चलचित्र २५ डिसेंबर या दिवशी समाजिक माध्यमांत फिरू लागले आहे.
फोंडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयातही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच आकस्मिक भेट दिली. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काही अधिकारी आणि मामलेदार अनुपस्थित असल्याचे आढळले. याविषयी उपजिल्हाधिकार्यांनी संबंधित मामलेदार एका मंत्र्याच्या कार्यक्रमाला गेल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. संबंधित मामलेदारांना मंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचा आदेश तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्यांनीच दिला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘लोकांची कामे बाजूला ठेवून मंत्र्यांच्या स्वागतासाठी मामलेदारांना पाठवण्याची आवश्यकता काय आहे ? यापुढे अशा घटना होता कामा नयेत. अगदी एखाद्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती असली, तरी त्या ठिकाणी मामलेदारांना पाठवू नका.’’
लवकरच कोणत्याही क्षणी निवडणूक आचारसंहिता लागू होणार असल्याने त्यानंतर विशिष्ट प्रकारची कामे करता येणार नाहीत, तसेच मामलेदारही निवडणूक कामात व्यस्त असणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शासकीय अधिकार्यांना ही ताकीद दिली आहे. प्राप्त माहितीनुसार ‘मामलेदार लोकांच्या कामासाठी फार अल्प उपलब्ध असतात’, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे आलेली आहे. या तक्रारीमुळेच मुख्यमंत्र्यांनी मामलेदार कार्यालयात आकस्मिक भेट दिल्याचे समजते.