भाजपचे आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत कणकवली पोलीस ठाण्यात उपस्थित

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमणाचे प्रकरण

भाजपचे आमदार नितेश राणे कणकवली पोलीस स्टेशनमध्ये

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उपाख्य गोट्या सावंत यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार २५ डिसेंबर या दिवशी दोघांनीही कणकवली पोलीस ठाण्यात उपस्थिती दर्शवत स्वत:चे म्हणणे मांडले.

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत ४५ मिनिटे दोघांचीही चौकशी करण्यात आली. ‘या प्रकरणी पोलिसांना आम्ही सर्वतोपरी साहाय्य करू’, असे आमदार राणे यांनी सांगितले.

परब यांच्यावर नुकतेच येथील बाजारपेठेत प्राणघातक आक्रमण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. हे पाचही जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.