नाशिक येथील अमोल इगे हत्येप्रकरणी दोषारोपपत्र प्रविष्ट करून दोषींवर कठोर कारवाई करणार ! – सतेज पाटील, गृहराज्यमंत्री
अमोल इगे यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार्या पोलीस अधिकार्यांवर कठोर कारवाईची भाजपची मागणी
मुंबई, २५ डिसेंबर (वार्ता.) – नाशिक येथे युनियनच्या वादातून अमोल इगे या युवकाची हत्या झाली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या हत्येचे अन्वेषण करत पोलिसांनी घटनेच्या दिवशीच आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचे दोषारोपपत्र प्रविष्ट करून चौकशीअंती दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील यांनी २४ डिसेंबर या दिवशी विधानसभेत सांगितले. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह भाजपच्या सदस्यांनी इगे यांनी स्वतःच्या संरक्षणाचे पत्र पोलिसांना दिल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित पोलीस अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली; मात्र सतेज पाटील यांना याविषयी सदस्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे भाजपचे सदस्य आक्रमक झाले.
विधानसभेत सदस्य सीमा हिरे यांनी नाशिक शहरात अमोल इगे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी लक्षवेधी मांडली होती. यास गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील यांनी उत्तर दिले. पाटील म्हणाले, अमोल इगे यांची नाशिक येथे ज्या दिवशी हत्या झाली, त्याच दिवशी दुपारी पोलिसांनी आरोपीस भिवंडी येथून अटक केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इगे हा भाजपचा नेता होता. त्याला कल्पना होती की, कुणीतरी माझी हत्या करण्याचे कारस्थान रचू शकते. त्यामुळे त्यांनी संरक्षणासाठी पोलीस ठाण्यात पत्र दिले होते. नाशिक येथे जाऊन ते पत्र मी स्वतः पाहिले आहे. या प्रकरणाच्या षड्यंत्रातील सर्वांवर कारवाई होणे आवश्यक आहे. या हत्येच्या पाठीशी कोण आहे ? याचा छडा लागला पाहिजे. या प्रकरणी नाशिक येथे आंदोलन करणारे भाजपचे आमदार आणि पदाधिकारी यांच्यावर नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली. या वेळी सतेज पाटील यांनी इगे यांनी दिलेल्या पत्राकडे दुर्लक्ष करणार्या पोलीस अधिकार्यांवरील कारवाईविषयी सदस्यांना ठोस असे काहीच सांगितले नाही. या चर्चेत सदस्य सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाग घेतला.