ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून मुंबईत ठिकठिकाणी निवेदने !

दोन तहसीलदार कार्यालये, नऊ पोलीस ठाणी, चार शाळा, तसेच दोन शिकवणीवर्ग येथे निवेदने दिली

मुंबई, २५ डिसेंबर (वार्ता.) – ख्रिस्ती नववर्षानिमित्त २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या दिवशी गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान, पार्ट्या करणे अन् फटाके फोडणे असे अपप्रकार होतात. हे रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने मुंबईत दोन तहसीलदार कार्यालये, नऊ पोलीस ठाणी, चार शाळा, तसेच दोन शिकवणीवर्ग यांना समितीकडून निवेदने देण्यात आली.

हिंदु जनजागृती समिती चांगली जागृती करत आहे ! – संदीप थोरात, तहसीलदार, मुलुंड

निवेदन स्वीकारतांना मुलुंडचे तहसीलदार संदीप थोरात (उजवीकडे)

मुलुंड येथील तहसीलदार संदीप थोरात आणि अंधेरी येथील नायब तहसीलदार सचिन भालेराव यांनी निवेदन स्वीकारले. ‘आजची युवा पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. समिती यासंदर्भात चांगली जागृती करत आहे. आम्ही हे तुमचे निवेदन पुढे जिल्हाधिकार्‍यांना पाठवू’, असे तहसीलदार संदीप थोरात यांनी सांगितले.

निवेदन स्वीकारतांना नेरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवास शिंदे (उजवीकडे)

पंतनगर पोलीस ठाणे, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर पोलीस ठाणे (पश्चिम), कांजूर पोलीस ठाणे, शाहूनगर पोलीस ठाणे धारावी, भायखळा पोलीस ठाणे, लालबाग पोलीस ठाणे, काळाचौकी पोलीस ठाणे, जोगेश्वरी पोलीस ठाणे (पूर्व) आणि नेरूळ पोलीस ठाणे येथेही निवेदन देण्यात आले.

 

निवेदन स्वीकारण्यास २ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा नकार !

२ पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी निवेदन स्वीकारले नाही. ‘आम्ही हे सर्व करतच आहोत. आम्हाला आवश्यकता भासली की, आम्ही तुम्हाला संपर्क करून बोलावू. तुमचा भ्रमणभाष क्रमांक द्या’, असे त्यांनी सांगितले.

घाटकोपर येथे चार शाळा, तसेच शिकवणीवर्ग येथे निवेदनाद्वारे जागृती !

निवेदन स्वीकारतांना (डावीकडून) घाटकोपर पूर्व येथील मराठी विद्यालयाचे शिक्षक श्री. संजय शिरसाट, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. विष्णू कोकाटे

पंतनगर, घाटकोपर येथील सुयश विद्यालय, घाटकोपर मराठी विद्यालय, शिवाजी शिक्षण संस्था आणि महानगरपालिका शाळा क्र. ३ (हिंदी माध्यम) येथे निवेदन देण्यात आले. सुयश विद्यालयात मुख्याध्यापकांच्या वतीने श्रीमती स्नेहा राय यांनी निवेदन स्वीकारले. घाटकोपर (पूर्व) येथील मराठी विद्यालयाचे शिक्षक श्री. संजय शिरसाट यांनी आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. विष्णू कोकाटे यांनी निवेदन स्वीकारले. ‘शिवाजी शिक्षण संस्थे’च्या इंग्रजी माध्यमाचे श्री. सुशील जोशी यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदन स्वीकारतांना (डावीकडे) घाटकोपर शिवाजी शिक्षण संस्थेच्या इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. सुशील जोशी

जोगेश्वरी येथील ‘निकम क्लासेस’चे विजय निकम आणि ‘दीपक क्लासेस’चे श्री. दीपक कुडतरकर यांना निवेदन दिले. त्यांच्या सांगण्यानुसार ‘निकम क्लासेस’मध्ये २७ डिसेंबर या दिवशी, तर ‘दीपक क्लासेस’मध्ये २९ डिसेंबर या दिवशी विद्यार्थ्यांसाठी या विषयासंबंधी जागृती करणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

धर्मप्रेमी आणि समितीचे कार्यकर्ते यांचा सहभाग !

निवेदन देतांना मुंबईतील धर्मप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. यामध्ये धर्मप्रेमी सर्वश्री रवींद्र नलावडे, संकेत भालेराव, हरिदास जाधव, पांडुरंग गवस, विलास पाटील, गोविंद दुबे, अनंत सातपुते, नारायण पटेल, बजरंग दलाचे विनोद जैन, कांतीलाल पटेल, आनंद वालावलकर, विमल जैन, सुरज ठाकूर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सर्वश्री सतीश सोनार, रमेश घाटकर, प्रसाद मानकर, गणेश दुखंडे इत्यादी सहभागी झाले.