सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
शंकानिरसन
लेखांक ७
अनिता जगताप, मीरा रोड, ठाणे यांचा प्रश्न
१. काही जण भाड्याच्या घरात राहतात. त्यामुळे झाडे लावण्यास अडचण येते. अशा वेळी काय करावे ?
उत्तर : घराची काही हानी होणार नाही, तसेच शेजारच्यांना किंवा इमारतीतील कुणाला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने लागवड केली, तर शक्यतो कुणी विरोध करत नाही. सोसायटीच्या सार्वजनिक जागेत पुढाकार घेऊन लागवड केल्यास उत्तम प्रतिसादही मिळू शकेल. आपला इतरांशी परिचय वाढेल. अशा प्रकारे समष्टी सेवाही होऊ शकेल. स्थानिक परिस्थितीनुसार हे तारतम्याने ठरवावे.
सौ. नेहा जोशी, मुलुंड, मुंबई यांचे प्रश्न
१. झाडाला बुरशी येते. त्याला काय करावे ?
उत्तर : गोमूत्र, जिवामृत, आंबट ताक यांपैकी कोणत्याही पदार्थात १० पट पाणी घालून फवारणी करावी.
२. हळदीचे झाड वाढत आहे; पण खालची पाने पिवळी झाली आहेत. याला कारण काय ?
उत्तर : हळदीची रोपे ४ मासांपेक्षा मोठी असतील, तर जुनी पाने पिवळी होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. लवकरच पूर्ण रोपही पिवळे होऊ शकते.
३. गेल्या ५ मासांपासून आमच्याकडील गुळवेलीला पाने येत नाहीत; पण ती जिवंत आहे. याचे कारण काय ?
उत्तर : गुळवेलीला पावसाच्या दिवसांतच पाने असतात. नंतर पाने न्यून होतात. गुळवेल जिवंत असेल, तर तिला पाने फुटतील. जिवामृताची आणि आंबट ताकाची फवारणी (१० पट पाणी मिसळून) आठवड्यातून एकदा करावी.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २.१२.२०२१)