काळानुसार आवश्यक असलेले सप्तदेवतांचे नामजप सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप यांवर उपलब्ध !

‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा ?’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने विविध नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत समन्वयक सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार नामजप ध्वनीमुद्रित केले असून ते सर्वांसाठी सनातन संस्थेचे संकेतस्थळ आणि ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप येथे उपलब्ध आहेत. त्यांमध्ये ‘श्री गणेशाय नमः ।’, ‘ॐ गँ गणपतये नमः ।’, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, ‘ॐ नमः शिवाय ।’, ‘श्री गुरुदेव दत्त ।’, ‘श्री हनुमते नमः ।’, ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’, ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हे सप्तदेवतांचे नामजप, तसेच ज्यांना कुलदेवता ठाऊक नाही, त्यांच्यासाठी ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ या नामजपांचाही समावेश आहे. या नामजपांचे महत्त्व, वैशिष्ट्ये नामजप करण्याची पद्धत, तसेच देवतेचा नामजप अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य असणे का आवश्यक आहे ? यांविषयीचे लिखाण येथे देत आहोत.

१. देवतेच्या नामजपाचा उच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य असणे आवश्यक का आहे ?

देवतेच्या विविध उपासनापद्धतींपैकी कलियुगातील सर्वांत सोपी उपासना म्हणजे ‘देवतेचा नामजप करणे’. देवतेविषयी मनात पुष्कळ भाव निर्माण झाल्यानंतर देवतेचे नाम कसेही घेतले, तरी चालते; परंतु सर्वसाधारण साधकामध्ये एवढा भाव नसतो. यासाठी देवतेच्या नामजपातून देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ होण्यासाठी त्या नामजपाचा उच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य असणे आवश्यक असते.

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

२. देवतेच्या नामजपाचे महत्त्व

भावपूर्ण आणि तळमळीने केलेल्या नामजपामुळे व्यक्तीला होणार्‍या अनिष्ट शक्तींच्या त्रासाचे निवारण होऊ शकते. अनेकांना हे ठाऊक नसल्याने ते अनिष्ट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी भगताकडे जातात. भगताने केलेली उपाययोजना तात्कालिक असते; म्हणून काही काळाने अनिष्ट शक्ती व्यक्तीला पुन्हा त्रास देऊ लागतात, तसेच भगताकडून फसवणूक होण्याचाही धोका असतो. यामुळे अनिष्ट शक्तींच्या त्रासावर मात करण्यासाठी नामजप उपयुक्त आहे.

३. सनातन-निर्मित ‘सप्तदेवतांच्या नामजपां’चे महत्त्व

३ अ. काळानुसार नामजपांची निर्मिती : कोणतीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘काळानुसार सध्या देवतांचे तत्त्व नामजपांतून कशा प्रकारे अधिक मिळू शकते ?’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून हे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. यासाठी सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक प्रयोग केले. त्यांतून हे नामजप सिद्ध (तयार) झाले आहेत. त्यामुळे हे नामजप केल्यास त्यांतून काळानुसार आवश्यक असे त्या त्या देवतेचे तत्त्व प्रत्येकाला त्याच्या भावाप्रमाणे मिळण्यास साहाय्य होईल.

३ आ. काळानुसार वाढत असलेल्या अनिष्ट शक्तींच्या त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त असलेले नामजप : वर्ष २०२५ मध्ये सात्त्विक आणि आदर्श असे ‘हिंदु राष्ट्र’ (ईश्वरी राज्य) स्थापन होणार आहे. ‘ते होऊ नये’, यासाठी वातावरणातील अनिष्ट शक्ती पूर्ण बळ एकवटून विरोध करत आहेत. त्याचा परिणाम म्हणून साधकांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांमध्ये पुष्कळ वाढ होत आहे. हे नामजप काळानुसार परिणामकारक असल्याने तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या व्यक्तींना या नामजपांचा आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या दृष्टीने चांगला लाभ होऊ शकतो.

३ इ. आत्यंतिक रुग्ण आणि वास्तूशुद्धी यांसाठीही नामजप लाभदायक : आत्यंतिक रुग्ण असलेल्या व्यक्तींना स्वतः नामजप करणे शक्य नसेल, तर त्यांनी हे नामजप ऐकल्यासही त्यांना लाभ होईल. सध्या अनिष्ट शक्तींच्या वाढत्या आक्रमणांमुळे वास्तूवरही परिणाम होऊन ती रज-तमाने दूषित होते. नामजप दिवसभर घरात लावून ठेवल्यास वास्तूशुद्धी होऊन घरातील वातावरणही प्रसन्न होण्यास साहाय्य होईल.

३ ई. कुलदेवता ठाऊक नसणार्‍यांसाठी कुलदेवतेचा ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हा नामजप उपलब्ध ! : कुलदेवता ही कुळाची आई असते. साधकाच्या साधनेचा आरंभ कुलदेवतेच्या उपासनेने होतो. तिच्या उपासनेनेच साधक साधना करत श्री गुरूंपर्यंत पोचू शकतो. सनातन संस्थेत आरंभी प्रत्येकाला त्याच्या कुलदेवतेचा नामजप करण्याची साधना सांगण्यात येते. आजकाल बर्‍याच जणांना त्यांची कुलदेवता ठाऊक नसते किंवा ते सांगणारे कुळातील कुणी उपलब्धही नसते. अशा वेळी ‘काय करावे ?’, हा प्रश्न त्यांच्यासमोर येऊ शकतो. त्यामुळे कुलदेवता ठाऊक नसणार्‍यांसाठी ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हा नामजप उपलब्ध करण्यात आला आहे.

३ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा नामजपांमागे असलेला संकल्प : ‘जगभरातील साधकांचे आध्यात्मिक त्रास लवकर दूर व्हावेत, तसेच त्यांना देवतांच्या तत्त्वांचा अधिकाधिक लाभ व्हावा’, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार नामजपांची निर्मिती करवून घेतली आहे. यामध्ये त्यांचा अप्रत्यक्ष संकल्पच कार्यरत झाला असल्याने या नामजपांनुसार साधकांनी नामजप केल्यास त्यांचे त्रास दूर होण्यास, तसेच त्यांना देवतांच्या तत्त्वांचा लाभ होण्यास निश्चितच साहाय्य होईल.

४. नामजप ऐकण्याची किंवा करण्याची पद्धत

अ. वर उल्लेख केलेल्या सप्तदेवतांचे नामजप आरंभी प्रत्येकी अर्धा घंटा ऐकावेत किंवा करावेत. आध्यात्मिक त्रास असलेल्यांना या नामजपांपैकी जो नामजप ऐकतांना अधिक त्रास जाणवत असेल, त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून उपायांच्या वेळी तो नामजप ऐकावा किंवा करावा.

आ. आध्यात्मिक त्रास नसलेल्यांना या नामजपांपैकी जो नामजप ऐकतांना अधिक चांगले जाणवत असेल, त्यांनी साधना म्हणून तो नामजप ऐकावा किंवा करावा.

५. नामजप म्हणण्याची गती आणि दोन जपांतील अंतर

नामजप करतांना ‘प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा करावा ? त्याचा कालावधी किती असावा, तसेच तो म्हणण्याची पद्धत कशी असावी ?’, या दृष्टीने आणि भावासहित म्हटलेले हे नामजप परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ध्वनीमुद्रित केले आहेत. हे नामजप प्रातिनिधिक आहेत. व्यक्तींनुसार नामजप म्हणण्याची गती आणि दोन जपांतील अंतर पालटू शकते.

५ अ. नामजप म्हणण्याची गती : मनुष्याच्या प्रकृतीप्रमाणे त्याची जप म्हणण्याची गती असते. आपण निर्मिलेले सगळे नामजप मध्यम गतीचे आहेत. ज्यांना जलद गतीने जप म्हणायचा आहे, त्यांनी जप म्हणण्याच्या पद्धतीने जप जलद गतीत म्हणावा; पण जप म्हणण्याची पद्धत मात्र पालटू नये. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा साधनेचा सिद्धांत असल्याने ज्या गतीने नामजप केल्यावर भाव अधिक प्रमाणात जागृत होतो, त्या गतीने नामजप करावा.

५ आ. दोन नामजपांमधील अंतर : ‘एका नामजपानंतर तोच नामजप ऐकण्यापूर्वी मधे किती अंतर असावे ?’, याविषयी मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘व्यक्तीच्या प्रकृतीनुसार दोन जपांमधील अंतर अधिक-उणे होऊ शकते. त्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे हा नामजप म्हणतांना हे अंतर आपण पालटू शकतो.’’ ध्वनीमुद्रित केलेल्या या नामजपात सर्वसाधारण अंतर ठेवण्यात आले आहे.

सनातन संस्थेमध्ये अशा प्रकारे सूक्ष्माकडे नेणारा अभ्यास करायला शिकवले जाते. त्यामुळेच अन्य संप्रदायांच्या तुलनेत सनातनच्या साधकांची प्रगती जलद गतीने होत आहे.’

– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्यविद्यालय, गोवा. (२२.१२.२०२१)

१. नामजप ऐकण्यासाठी सनातनच्या संकेतस्थळाची मार्गिका

https://www.sanatan.org/mr/audio-gallery

२. ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या !

https://www.sanatan.org/Chaitanyavani

‘हे सर्व नामजप ऐकून काय जाणवते ?’, याचा अभ्यास करा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास त्या आम्हाला contact@sanatan.org या ई-मेल पत्त्यावर किंवा ई-मेल नसलेल्यांनी पुढील पत्त्यावर अवश्य कळवाव्यात.

टपालाचा पत्ता

सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक