नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष साजरीकरण अन् ‘ओमिक्रान’चा संभाव्य धोका यांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची चेतावणी

सावधगिरी बाळगा अन्यथा रात्रीची संचारबंदी लागू करावी लागेल ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी – देशात ‘ओमिक्रॉन’च्या संसर्गाचा धोका असल्याने नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष साजरे करतांना सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. पर्यटन उद्योग आणि नागरिक यांनी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. सूचनांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष झाल्यास रात्रीची संचारबंदी लागू करावी लागणार आहे. नागरिक आणि व्यावसायिक यांनी ही पाळी आणू नये, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोव्यात ‘ओमिक्रॉन’चा एकही रुग्ण आढळला नसला, तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यात कोरोनाविषयक चाचणीच्या तुलनेत कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळण्याच्या टक्केवारीमध्ये १.८ टक्क्यांवरून ३.८ टक्के, अशी वाढ झालेली आहे, तसेच कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग होण्याची भीती सर्वत्र आहे.

‘ओमिक्रान’च्या संभाव्य धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कृतीदलाची २४ डिसेंबरला एक उच्चस्तरीय बैठक झाली.

ते पुढे म्हणाले, ‘‘पुढील एक मासाच्या आत गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘ओमिक्रान’च्या संसर्गाची चाचणी करणारे यंत्र बसवण्यात येणार आहे.’’ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने नेमलेल्या वैद्यकीय तज्ञ समितीची ‘ओमिक्रॉन’च्या संभाव्य धोक्यावरून २७ डिसेंबर या दिवशी एक बैठक होणार आहे.