राज्यातील खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांची लूट झाल्याची आरोग्यमंत्र्यांची विधान परिषदेत स्वीकृती !
शासकीय योजना जनतेपर्यंत न पोचता जनतेलाच कसे लुबाडले जाते, याचे हे आणखी एक मोठे उदाहरण ! महामारीत जनतेला लुबाडणारी रुग्णालये एरव्ही किती लुटत असतील ! – संपादक
मुंबई, २४ डिसेंबर (वार्ता.) – शासनाने उपचारांची रक्कम निश्चित करून दिली असतांना कोरोनाच्या कालावधीत खासगी रुग्णालयांनी भरमसाठ देयके आकारून रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांची लूट केल्याचे स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मान्य केले. कोरोनाच्या कालावधीत खासगी रुग्णालयांविषयी राज्यातून एकूण ६३ सहस्र ३९८ तक्रारी आल्या. त्यांतील ५६ सहस्र ९९४ तक्रारी सोडवण्यात आल्या. यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे ३५ कोटी १८ लाख ३९ सहस्र ६१ रुपये परत करण्यात आले, अशी धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २३ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिली. (वैद्यकीय आस्थापना कायदा कधी लागू करणार ? – संपादक) रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी याविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती.
यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत शासनाकडून निधी देण्यात आला असूनही खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून पैसे घेतले. याविषयी माहिती देतांना राजेश टोपे यांनी सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ नाकारल्याविषयी २ सहस्र ८१ तक्रारी आल्या. १ कोटी २० लाख ६६ सहस्र १६८ रुपये रुग्णांना परत करण्यात आले.