शासकीय गोदामातील धान्य वितरणाकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याविषयी सरकारने कोणती कार्यवाही केली ? – प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप
मुंबई – महाड शहरातील नवेनगर येथील शासकीय गोदामातील धान्यसाठा २२ आणि २३ जुलैच्या महापुरात खराब झाल्याचे निदर्शनास आले. तरी शासकीय गोदामातील धान्य वितरणाकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याविषयी शासनाने कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात २३ डिसेंबर या दिवशी उपस्थित केला होता.
या प्रश्नावर उत्तर देतांना अन्न आणि नागरी पुरवठा अन् ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नवेनगर येथील शासकीय गोदामातील धान्यसाठा खराब झाला हे अंशत: खरे आहे. २२ आणि २३ जुलै या दिवशी झालेल्या अतीवृष्टीमुळे आलेल्या पुराचे पाणी ओसल्यानंतर २४ जुलै या दिवशी पहाणी करून २६ जुलै या दिवशी प्राथमिक पंचनामा करण्यात आला. त्या पुरात गोदामात ५ ते ६ फूट पाणी जाऊन सरासरी ९ थरांपर्यंत धान्य खराब झाले. (धान्यसाठा ६ फूट पाण्याखाली गेल्यावर तो साठा खराब झाला, हे अंशत: खरे आहे, असे नेते म्हणत असतील, तर त्यावर कोण विश्वास ठेवील ? – संपादक) पंचनाम्याअंती पुराच्या आधीच्या साठ्यापैकी जे धान्य खराब झाले त्याची आकडेवारी आणि शिल्लक साठ्याची आकडेवारी पहाता असे झाल्याचे आढळून येत नाही.
यावर आमदार प्रशांत ठाकरू यांनी ‘मग दोनदा पंचनामा का केला ?’ असा प्रश्न केल्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी, ‘‘या गोदामातील ६१६ क्विंटल तांदूळ आणि १०८ क्विंटल गहू वितरण योग्य आहे, असे आढळून आले असून खराब झालेले धान्य खाण्यायोग्य आहे का ? याची पडताळणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.’’ असे उत्तर दिले.