बेळगाव येथील मराठी युवकांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्रातील युवक शांत बसणार नाहीत ! – रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

रोहित पवार

मुंबई, २४ डिसेंबर (वार्ता.) – बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अवमानाची घटना घडल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद बेळगाव येथे उमटले. यानंतर कर्नाटक पोलिसांनी १५ डिसेंबर या दिवशी मराठी युवकांना घरात घुसून कह्यात घेतले, तसेच त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्यात आले. तरी महाराष्ट्र सरकारने तेथील सरकारशी बोलणी करून बेळगाव परिसरात असणार्‍या आणि खोट्या गुन्ह्यांखाली अटक केलेल्या युवकांना सोडण्यास सांगावे. प्रसंगी केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलावे. बेळगाव येथील मराठी युवकांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्रातील युवक शांत बसणार नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत २४ डिसेंबर या दिवशी सकाळच्या सत्रात व्यक्त केले. ते हरकतीच्या सूत्रावर (पॉईन्ट ऑफ इनफॉरमेन्शन) बोलत होते.

या प्रकरणाच्या संदर्भात बेळगाव आणि सीमाभागांतील काही युवकांनी २४ डिसेंबर या दिवशी भेट घेतली. त्यावर सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी रोहित पवार यांनी ही हरकत उपस्थित केली.