दत्तजयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात अध्यात्मप्रसार !
ठाणे, २४ डिसेंबर (वार्ता.) – दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच दत्त उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे, यासाठी ‘ऑनलाईन’ व्याख्याने, सामूहिक नामजप, फलकप्रसिद्धी, सोशल मिडीया आदी माध्यमांतून ठाणे जिल्ह्यात लोकांचे प्रबोधन करण्यात आले, तर १६ ठिकाणी प्रवचने घेऊन दत्त उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना सांगितले. सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने ठाणे, कल्याण, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर या भागांत एकूण १५ ठिकाणी दत्त मंदिरांजवळ ग्रंथप्रदर्शने लावून अध्यात्मप्रसार करण्यात आला. या ग्रंथ कक्षांच्या माध्यमांतून अध्यात्म आणि साधनेविषयी अलौकिक ज्ञान असलेले सनातनचे ग्रंथ भाविक आणि जिज्ञासू यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आले. या सर्व ग्रंथप्रदर्शनांना भेट देणारे भाविक आणि जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद लाभला.
दत्तगुरूंच्या उपासनेविषयीच्या ग्रंथांसह सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, आचारधर्म, धर्माचरण, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, ईश्वरप्राप्तीसाठी कला, आपत्काळात जीवित रहाण्यासाठी उपाय, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादनांचे येथे वितरण करण्यात आले. कोरोनाविषयीच्या सर्व नियमांचे पालन करून ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमातून हा प्रसार करण्यात आला.
अंबरनाथ (पूर्व) येथील श्रीराम विद्यामंदिर या हिंदी माध्यमाच्या शाळेत दत्तजयंतीचे प्रवचन घेण्यासाठी शाळेच्या संचालिका श्रीमती शोभा कदम आणि मुख्याध्यापक सोमनाथ तळपे यांनी विषय मांडण्यासाठी अनुमती दिली, तर साप्ताहिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. वर्षा वाणी यांचे विशेष सहकार्य लाभले.