आध्यात्मिक क्रांतीच्या दिशेने… !

संपादकीय

धार्मिक ग्रंथांची वाढती मागणी, ही हिंदुद्वेष्ट्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे !

उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथील ‘गीता प्रेस’च्या ग्रंथांत, विशेषतः ‘रामचरितमानस’ आणि ‘श्रीमद्भगवद्गीता’ यांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली असून गेल्या ५ मासांत सरासरी १ कोटी रुपयांनी ही वाढ चालूच आहे. ‘हिंदूंना धर्म जाणून घेण्याची जिज्ञासा’ किंवा ‘धर्मग्रंथांचे पठण करण्याची इच्छा’ वाढली आहे, असेच यामुळे म्हणावे लागते. ‘धर्माचरणी प्रजा असणार्‍या हिंदु राष्ट्राची स्थापना वर्ष २०२५ मध्ये होणार आहे’, असे सर्व संत सांगत असतांना अशा प्रकारे ‘धार्मिक ग्रंथांची विक्री वाढल्या’चे लक्षात येणे, हे त्याच्या नांदीचेच एक सुचिन्ह समोर आले आहे.

‘गीता ‘प्रेस’ नव्हे, तर दिशादर्शक स्थळ !

गीता प्रेस ही भारतातील ११ भाषांमध्ये गीता आणि रामचरितमानस यांव्यतिरिक्त विविध आध्यात्मिक, धार्मिक, पौराणिक ग्रंथ, तसेच नीतीनियम आणि संस्कार यांसारख्या विषयांवरील २ सहस्रांहून अधिक पुस्तकांच्या कोट्यवधी प्रती छापणारी ९७ वर्षे जुनी प्रकाशन संस्था आहे. लाभासाठी नव्हे, तर केवळ अल्प मूल्यामध्ये धार्मिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चालू असलेल्या ‘गीता प्रेस’चे विशेष म्हणजे संपादकांमध्ये भ्रष्टता येऊ नये; म्हणून ‘कुठल्याही प्रकारचे दान घ्यायचे नाही’, हे त्यांचे धोरण आहे. बाजार मूल्यापेक्षा ४० ते ९० टक्के स्वस्त आणि व्याकरणदृष्ट्या शुद्ध धार्मिक ग्रंथ हे गीता प्रेसचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या आणि अशा काही कारणांमुळे ७०० हून अधिक कर्मचारी असणारे हे केवळ मुद्रणालय नव्हे, तर देशासह जगाला धर्मज्ञान देऊन एक प्रकारे मोक्षमार्गाकडे नेणारे दिशादर्शक स्थळ ठरले आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा तेथील कर्मचार्‍यांनी वेतनवाढीसाठी संप केला, तेव्हा धर्मप्रेमींकडून उत्स्फूर्तपणे ‘सेव्ह गीता प्रेस’ (गीता प्रेसला वाचवा) असा ‘ट्विटर ट्रेंड’ही चालवला गेला.

हिंदुद्वेषी काँग्रेसने केलेली धर्महानी

इंग्रज किंवा मोगल यांनी केली नसेल एवढी अपरिमित धर्महानी स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांत काँग्रेस सरकारने केली. वास्तविक मुसलमानांना त्यांचे राष्ट्र दिल्यावर उरलेले ‘हिंदूंचे राष्ट्र’ म्हणून उदयास येणे अपेक्षित होते; मात्र हिंदुद्वेषी काँग्रेसजनांमुळे सनातन हिंदु परंपरा, संस्कृती, धर्माचरण, धार्मिक साहित्य यांची करता येईल, एवढी हानी काँग्रेसी धोरणांनी केली. संस्कृतला मृत ठरवून हद्दपार केले. मातृभाषांना डावलून इंग्रजीचे महत्त्व नको इतके वाढवून ठेवले. हिंदूंचा खरा दैदिप्यमान प्राचीन आणि शौर्य जागृत करणारा अर्वाचीन इतिहास लपवून प्रत्यक्षात परकियांचा उदोउदो करणारे लिखाण पुढे आणून त्याचा प्रसार केला. दुसरीकडे इस्लामी आणि ख्रिस्ती पंथांच्या प्रभावाने आलेले साहित्य, कला आदींचा मोठ्या प्रमाणात पुरस्कार चालू केला. याचा परिणाम सुशिक्षित हिंदूंना त्यांचा धर्म, परंपरा, इतिहास यांविषयीचा अभिमान तर सोडाच; पण उलट त्याविषयी तुच्छता आणि न्यूनता वाटू लागली. त्यामुळेच धर्मश्रद्धांचा अवमान झाला, तरी त्यांना काही वाटेनासे झाले.

हिंदु राष्ट्राच्या नांदीची सुचिन्हे !

गेल्या ८ वर्षांपासून ही स्थिती पालटण्यास आरंभ झाला. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना मिळालेला पाठिंबा पहाता हिंदूंच्या अनेक महनीय गोष्टींविषयी चर्चा होऊ लागल्या. त्यात वेदांमधील विज्ञान आणि ऋषिमुनींनी लावलेले शोध यांची चर्चा होऊ लागली. यात योग, आयुर्वेदापासून हिंदूंच्या अतीवैशिष्ट्यपूर्ण मंदिर स्थापत्यकलेपर्र्यंत सारेच गौरवान्वित असल्याचे तरुण पिढीच्या आणि हिंदूंच्या लक्षात येऊ लागले. विशेषतः कोरोना महामारीच्या कालावधीत हिंदु संस्कृतीचे महत्त्व भारतियांसह जगाच्या विशेषत्वाने लक्षात आल्याने माध्यमांनाही ते अधोरेखित करण्यावाचून पर्याय राहिला नाही. ‘हिंदु धर्माला न्यून न लेखता त्याची जागा अभिमानाने घ्यायला हवी’, हे हिंदूंच्या लक्षात येऊ लागले. ‘हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांची वाढती मागणी’ हाही काळानुसार घडणार्‍या या पालटाचा, परिष्कृत (शुद्ध) धार्मिक हिंदुत्वाच्या लाटेचाच हा पुढचा टप्पा म्हणावा लागेल.

काँग्रेसने श्रीरामाचे अस्तित्व नाकारले आणि त्याची ‘चर्चा’ झाली अन् रामसेतू प्रत्यक्षात उपग्रहातील चित्रातूनही दिसत असल्याचे सर्वांच्या समोर आले. राममंदिराला जेवढा विरोध झाला, तेवढी त्याविषयी चर्चा झाली आणि त्याच्या अस्तित्वाचे पुरावे समोर आले. गीता प्रेसच्या विश्वस्तांचे म्हणणे आहे की, राममंदिर उभे रहात असल्यामुळे त्याचा लाभही धार्मिक पुस्तकांची विक्री होण्यात झाला आहे. अमेरिका, जर्मनी, जपान यांसारख्या देशांत हिंदु धर्माच्या पताका केव्हाच फडकू लागल्या आहेत. बहुसंख्य विदेशी हिंदु धर्माशी संस्कृत, योग, आयुर्वेद, धार्मिक विधी अशा कुठल्या ना कुठल्या मार्गाने जोडले जात आहेत; मात्र गेल्या काही दिवसांत इस्लाम धर्मातील काही प्रसिद्ध व्यक्तींनीही आता हिंदु धर्मात परत येणे चालू केले आहे, हे कशाचे द्योतक आहे ? इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया हिंदु संस्कृतीचा पुरस्कार करत असतांना आता दुबईमध्येही प्रचंड मोठे स्वामी नारायण मंदिर उभे रहात आहे.

हिंदु विरोधकांना चपराक !

वरीलप्रमाणे हिंदु धर्म आणि धर्मीय यांना अनुकूल एक एक घटना घडत असल्याने नाईलाजाने का होईना साम्यवादी माध्यमे, विचारवंत आणि नेते आदींना हिंदु परंपरांचे गुणगान गावे लागत आहे; नव्हे काळानेच त्यांच्यावर ही वेळ आणून त्यांना मोठी चपराक दिली आहे. अखिलेश यादव गंगास्नान करू लागले, केजरीवाल भाविकांना अयोध्या वारीसाठी नेऊ लागले. हिंदूंमध्ये धर्माभिमान वाढत असल्याने आता साहजिकच राजा बनू पहाणार्‍यांनाही हिंदु धर्माच्या महतीपुढे झुकावे लागत आहे. हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेपूर्वीचा हा संधीकाळ आहे आणि त्यानुसार अधिकाधिक हिंदूंचा धर्माचरणाकडे कल वाढला आहे. त्यामुळे ‘धार्मिक ग्रंथांची वाढती मागणी’, हा या आध्यात्मिक क्रांतीचाच एक भाग म्हणावा लागेल !