‘ओमिक्रॉन’चा वाढता प्रसार पहाता उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याचा विचार करावा !

अलाहाबाद उच्च न्यायालयाची पंतप्रधान मोदी यांना सूचना

जीव आहे, तर जग आहे ! – उच्च न्यायालय

जर निवडणुकांच्या प्रसारामुळे आणि सभांमुळे कोरोनाच्या संसर्गात वाढ होणार असेल, तर ही निवडणूक पुढे ढकलणे आवश्यकच आहे ! हे का सांगावे लागते ? – संपादक

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – देशात कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या प्रकाराचा संसर्ग वाढत असल्याने आगामी उत्तरप्रदेश राज्याच्या विधानसभेची निवडणूक काही काळ पुढे ढकलण्याच्या संदर्भात विचार करावा; कारण ‘जीव आहे, तर जग आहे’, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले आहे. तसेच ‘उत्तरप्रदेशमध्ये सध्या ठिकठिकाणी चालू असलेल्या राजकीय सभांवरही बंदी घालायला हवी’, असे न्यायालयाने म्हटले आहे.

१. उच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, राज्यातील निवडणूक सभा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच निवडणूक आयुक्त यांनी कठोर पावले उचलावीत. राजकीय पक्षांना ‘दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रे यांच्या माध्यमातून प्रचार करा’, असे सांगावे.

२. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोदी यांचे लसीकरणावरून कौतुकही केले आहे. ‘भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात विनामूल्य लसीकरण अभियान चालवले, हे कौतुकास्पद आहे’, असे न्यायालयाने म्हटले.