लुधियाना येथील बाँबस्फोटामागे खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसाचा हात असल्याची शक्यता

बंदी घालण्यात आलेली असतांनाही खलिस्तानी संघटना तिच्या कारवाया कशा काय करू शकत आहे ? काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही का ? – संपादक

लुधियाना (पंजाब) – येथील न्यायालयात झालेला स्फोट हा बाँबस्फोट होता आणि त्यात आर्.डी.एक्स.चा वापर करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. या बाँबस्फोटामागे बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी ‘बब्बर खालसा’ ही संघटना असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. न्यायालयातील प्रसाधनगृहात बाँब जोडतांना याचा स्फोट झाला आणि त्यात बाँब जोडण्याचा प्रयत्न करणारा आतंकवादी ठार झाला, असे सांगण्यात आले आहे. बब्बर खालसा संघटनेला पाकिस्तानकडून यासाठी साहाय्य केल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर लुधियानामध्ये कलम १४४ (जमावबंदीचा आदेश) लागू करण्यात आला आहे. या बाँबस्फोटाविषयी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. नॅशनल सेक्युरिटी गार्ड आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांचे पथक पंजाबला मार्गस्थ झाले आहेत. हे आतंकवादी आक्रमण असल्याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा स्वतंत्रपणे अन्वेषण करणार आहे.