भाजपचे आमदार नितेश राणे यांना पोलिसांकडून नोटीस

कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमणाचे प्रकरण

कणकवली : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमण

कणकवली – शहरातील नरडवे नाका येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर नुकतेच जीवघेणे आक्रमण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना गुन्ह्याच्या अन्वेषणाच्या कामी प्रत्यक्ष उपस्थित रहाण्यासाठी नोटीस बजावली आहे. या नोटिसीविषयी आमदार राणे यांनी सांगितले की, ‘‘पोलिसांच्या नोटिसीला लेखी उत्तर मी दिलेले आहे. त्यामुळे या नोटिसीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याचे कोणतेही कारण नाही.’’

शिवसैनिक परब यांच्यावर प्राणघातक आक्रमण करून संशयित आरोपी पसार झाले होते. ही घटना पोलिसांना समजताच पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली होती. त्यामुळे करूळ घाटमार्गे पळून जाण्याच्या प्रयत्नांत असलेल्या चौघांना पोलिसांनी तपासणी नाक्यावर चारचाकी गाडीसह अटक केली होती. या प्रकरणी परब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आमदार राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उपाख्य गोट्या सावंत यांना प्रत्यक्ष उपस्थित रहाण्यासाठी नोटीस बजावली आहे.

याविषयी आमदार राणे यांनी सांगितले की, दापोलीमध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेचे रामदास कदम आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात वाद चालू आहे, त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्यातही वाद आहेत. त्याचे पडसाद कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहेत. त्यांना कुणीतरी बळीचा बकरा पाहिजे म्हणून त्यांनी माझे नाव तक्रारीत लिहिले आहे.

परब यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी एकूण ५ जणांना पोलीस कोठडी

परब यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या ४ संशयित आरोपींच्या पोलीस कोठडीचा कालावधी २३ डिसेंबरला संपला, तर याच दिवशी पोलिसांनी अन्य एका आरोपीला अटक केली. या पाचही जणांना पोलिसांनी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावण्यात आली.