नगर येथील लाचप्रकरणी भूमीअभिलेख अधिकारी महिलेस ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा !
नगर – येथील भूमीअभिलेख विभागातील भूकरमापक अधिकारी ज्योती नराल यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवून ४ वर्षे सक्तमजुरी आणि २० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. (लाचखोरीमध्ये महिलाही आघाडीवर असणे, हे लज्जास्पद आहे ! अशांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. – संपादक)
नगर येथील एका शेतकर्याने भूमीअभिलेख कार्यालयात भूमीची ५ तुकड्यांत मोजणी करण्यासाठी अर्ज करून सरकारी मोजणीचे शुल्क भरले होते. त्याप्रमाणे भूकरमापक अधिकारी ज्योती नराल यांनी मोजणी करून नकाशा संबंधित शेतकर्याला दिला होता; मात्र मोजणीप्रमाणे ५ तुकड्यांत निशाणी नकाशाप्रमाणे प्रत्यक्ष भूमीवर दिली नव्हती. यासंदर्भात संबंधित शेतकर्याने नराल यांची भेट घेऊन प्रत्यक्ष भूमीवर निशाणी देण्याविषयी विनंती केली असता, त्यांनी त्यासाठी ५ तुकड्यांचे प्रत्येकी २ सहस्रांप्रमाणे एकूण १० सहस्र रुपये लाचेची मागणी केली. त्यावर संबंधित शेतकर्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंद केली होती.