आनंदी जीवनासाठी नामजप तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन आवश्यक ! – श्रीकांत बोराटे

श्री दत्तजयंतीनिमित्त माळवाडी (जिल्हा पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन !

माळवाडी (ता. भोर, जिल्हा पुणे), २२ डिसेंबर (वार्ता.) – सध्याचा काळ हा आपत्काळ असून प्रत्येकाचे जीवन संघर्षमय झाले आहे. मनुष्य जन्माचे सार्थक मोक्षप्राप्ती आणि आनंदीप्राप्तीमध्ये आहे. नामस्मरणाने हे शक्य होते. यासाठी प्रत्येकाने नामस्मरण करणे आवश्यक आहे. नामसाधना करतांनाच स्वतःमध्ये असणारे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी प्रयत्न करणे हेही महत्त्वाचे आहे. साधनेने हे सहज शक्य होऊ शकते. यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत बोराटे यांनी मार्गदर्शनातून सांगितले.

नामस्मरणाविषयी बोलतांना श्री. बोराटे म्हणाले, ‘‘नामस्मरण केल्याने आपल्यामध्ये सात्त्विकता वाढते, मन शांत, स्थिर रहाते आणि योग्य विचार येऊन त्याप्रमाणे आपल्याकडून योग्य कृती होते. आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्या कुलदेवतेचा, तर पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी श्री गुरुदेव दत्त हा नामजप प्रत्येकाने करायला हवा.’’

श्री दत्तजयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील माळवाडी येथील श्री दत्त मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या वतीने ‘आनंदप्राप्तीसाठी साधना आणि श्री दत्तजयंतीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. उपस्थित दत्तभक्तांनी जिज्ञासेने सर्व विषय समजून घेतला. नामजप कोणता आणि का करायचा हे अमूल्य मार्गदर्शन आम्हा सर्वांना मिळाले. प्रवचनात सांगितल्याप्रमाणे आम्ही कुलदेवीचा आणि श्री गुरुदेव दत्त हा नामजप प्रतिदिन करण्याचा प्रयत्न करणार, असे उपस्थित भक्तांनी सांगितले.

विशेष

माळवाडी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी महिलांनी स्वतःहून प्रवचन घेण्यासाठी भ्रमणभाष केला आणि तळमळीने प्रवचनाच्या आयोजनाची अन् प्रसाराची सेवा केली.