महिलांचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही ! – विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांची भावना
विधानसभा लक्षवेधी…
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर अवमान प्रकरणाची चौकशी चालू असून कारवाई होणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
मुंबई, २३ डिसेंबर (वार्ता.) – ‘महिलांचा अवमान सहन केला जाणार नाही’, अशा शब्दांत विधानसभेत २३ डिसेंबर या दिवशी सर्वपक्षीय आमदारांनी स्वतःच्या भावना बोलून दाखवल्या. ‘महापौर पेडणेकर यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आरोपीला अटक झाली आहे, तर शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटक होऊन जामीन मिळाला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत’, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी २३ डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.
बीडीडी चाळ, वरळी, मुंबई येथील सिलेंडर स्फोटात काही जण मृत झाले. याविषयी महापौर पेडणेकर यांच्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी खालच्या पातळीवर टीका केली होती, तसेच महापौर यांना अश्लाघ्य भाषेत धमकी देण्यात आली होती. याविषयी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु, अजय चौधरी, प्रकाश फातर्पेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर सभागृहात चर्चा झाली.
‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर जाहीर चर्चा करता येत नाही’, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यावर संसदीय कार्यमंत्री अनिल परब म्हणाले की, न्यायप्रविष्ट घटनेविषयी आपण चर्चा करत नाही, तर या प्रवृत्तीवर आपण बोलत आहोत. पिठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी ‘न्याप्रविष्ट घटनांवर बोलता येते. येथे चर्चा करण्यास हरकत नाही’, असे निर्देश दिले. यानंतर सभागृहात भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, मनिषा चौधरी, अजय चौधरी यांनी त्यांची मते मांडली.