महावितरण डबघाईला; ६० सहस्र कोटी रुपयांची थकबाकी !
वीजनिर्मिती आणि कामगारांचे वेतन देण्यात परवड होत असल्याचे नमूद करत मंत्र्यांनी विधान परिषदेत व्यक्त केली हतबलता !
मुंबई, २३ डिसेंबर (वार्ता.) – महावितरण चालवतांना परवड होत आहे. महावितरणचे उत्पन्न ५ सहस्र कोटी रुपये आहे; मात्र देयकांवर होणार व्यय ६ सहस्र कोटी रुपयांपर्यंत आहे. महावितरणला प्रतिमास १ सहस्र कोटी रुपये अधिक व्यय होत आहे. महानिर्मितीचा व्यय, वेतन, कर्ज, कर्जाचे हप्ते याचे गणित बसत नाही. सेवा देतांना पैशांची चणचण येत आहे. हा सर्व व्यय करतांना दमछाक होत आहे. सद्यस्थितीत महावितरणची ६० सहस्र कोटी रुपयांची थकबाकी आहे, अशी हतबलता ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी २३ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत व्यक्त केली. भाजपचे आमदार सदाशिव खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी पूर्वसूचना न देता शेतकर्यांच्या तोडण्यात येत असलेल्या वीजजोडणीविषयी सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर मंत्र्यांनी वरील माहिती दिली.
या वेळीची प्राजक्ते तनपुरे यांनी ‘वर्ष २०१४ मध्ये कृषीपंपाची थकबाकी १० सहस्र कोटी रुपये होती; मात्र महाविकास आघाडीकडे सत्ता आली, तेव्हा ही थकबाकी २० सहस्र कोटी रुपयांपर्यंत वाढली. अन्य प्रलंबित देयकांची रक्कम ४० सहस्र कोटी रुपये होती. महाविकास आघाडीकडे सत्ता आली, तेव्हा ही थकबाकी ६० सहस्र कोटी रुपयांपर्यंत वाढली. भाजप सरकारने देयकांची वसुली केली नाही. त्यामुळे ही थकबाकी वाढली’, असा आरोप केला.
चर्चेच्या वेळी सत्ताधारी पक्षातील एका आमदारांनी ‘शेतकरी वीज चोरतात’, असे वक्तव्य केले. या वेळी शेतकर्यांना चोर म्हणणार्या सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या वेळी सभागृहात झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे सभागृहाचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.