प.पू. दास महाराज यांनी बालपणी केलेल्या खोड्या, त्यामुळे त्यांना भोगावे लागलेले शारीरिक त्रास आणि खोड्या केल्यावरही त्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

२२.१२.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात आपण प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीमाता यांनी श्री. भांभूकाका जोशी यांच्याकडील मुलाचा (आताचे प.पू. दास महाराज यांचा) स्वतःचे मूल म्हणून स्वीकार करणे’ याविषयी पाहिले. आजच्या अंकात ‘प.पू. दास महाराज यांनी बालपणी केलेल्या खोड्या, त्यांमुळे त्यांना भोगावे लागलेले शारीरिक त्रास’ यांविषयी पाहूया.

(भाग ४)

मागील भाग पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/537168.html

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

५. रघुवीरचे (प.पू. दास महाराज यांचे) बालपण

५ अ. संडासला बसल्यावर अंग बाहेर येऊन त्रास होणे, भगवान श्रीधरस्वामींनी कोरफडीचा गर मंत्र म्हणून तेथे लावणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोरफडीचा गर खाल्ल्यानंतर त्रास पूर्णपणे बंद होणे : ‘वर्ष १९४५ मध्ये मी ३ वर्षांचा होतो. मी एकदम किडकिडाच (बारीक) होतो. मला बोळ्याने दूध पाजले जायचे. संडासला बसल्यावर माझे अंग बाहेर यायचे आणि संडासच्या गाठी यायच्या. महाराज येऊन ते दाबून ठेवायचे; पण ते परत बाहेर यायचे. गावठी वैद्यांनी सांगितले, ‘‘बांधून आत ठेवू; पण पोराला सहन होणार नाही.’’ त्या वेळी पू. रुक्मिणीआई महाराजांना म्हणाल्या, ‘‘अहो, श्रीधर स्वामींना तरी सांगा. पोराला त्रास होत आहे.’’ त्यानंतर वर्ष १९४६ मध्ये स्वामी चातुर्मासासाठी औदुुंबर येथे आले होते. तेव्हा त्यांचे मौन होते. महाराज मला श्रीधरस्वामींकडे घेऊन गेले. महाराजांनी स्वामींना सांगितले, ‘‘पोराचे अंग बाहेर येत आहे. त्याला त्रास होतो.’’ तेव्हा स्वामींनी त्यांच्या शिष्यांना कोरफड आणायला सांगितली. त्यांनी कोरफडीच्या बाजूचा काटेरी भाग कापून टाकला आणि आतील गर काढून मंत्र म्हणून तो मला लावला. त्यांनी महाराजांना सांगितले, ‘‘प्रतिदिन कोरफड आणून त्याला खायला द्या.’’ मग मी प्रतिदिन कोरफडीचा गर खायला लागलो. त्यानंतर माझी प्रकृती चांगली सुधारली आणि माझा त्रास पूर्णपणे बंद झाला. स्वामींच्या कृपेने मला आजपर्यंत तसा त्रास झाला नाही.

५ आ. रघुवीरच्या बालपणीच्या खोड्या !

५ आ १. ‘पैसे भूमीत पुरल्यावर त्याचे झाड येईल’, असे वाटून रघुवीरने तसे करणे, मित्रांनी ते पैसे चोरणे आणि त्यांनी मास्तरांकडे गार्‍हाणे केल्यावर रघुवीरने मुलांना पुष्कळ मारणे : मी लहानपणी पुष्कळ खोडकर होतो. ‘भूमीत पैसे पुरल्यावर त्याचे झाड उगवेल’, असे मला वाटायचे. त्यामुळे कुणी मला पैसे दिले, तर मी ते भूमीत पुरून ठेवायचो आणि त्या ठिकाणी दगड ठेवायचो. हे सर्व मी मित्रांच्या समवेत करत असे. मी पैसे पुरल्यावर तिकडून निघून गेल्यावर मुले ते पैसे चोरायचे. मी मुलांना त्याविषयी विचारल्यावर मुले म्हणायची, ‘‘रघ्या, तुझे पैसे आम्ही कशाला काढू ?’’ मग मी मास्तरांना सांगायचो, ‘‘मुलांनी माझे पैसे काढले.’’ मुले मला म्हणायची, ‘‘अरे खुळ्या, पैशाचे झाड कधी येईल का ?’’ ती मुले मास्तरांकडे माझे गार्‍हाणे करायची. मग मी त्या मुलांना पुष्कळ मारायचो.

५ आ २. रघुवीरने मुलांना मारल्यावर त्यांनी महाराजांकडे गार्‍हाणे करणे, महाराजांनी रघुवीरला मारल्यावर त्याने १ – २ दिवस घरी न जाणे आणि त्या वेळी आईने त्याला गुपचूप जेवण देणे : मी मुलांना पुष्कळ वेळा मारले आहे. मग मुले घरी येऊन महाराजांना ‘तुमच्या रघ्याने मारले’, असे सांगायची. मग महाराज मला ठोकायचे. मी रडत असे आणि १ – २ दिवस घरी जात नसे. मी आंब्याच्या झाडावर किंवा भीमापूर वाडीला असलेल्या तळघरात लपून बसायचो. आई मला गुपचूप तूप आणि मेतकूट घालून तांदळाची पेज द्यायची. महाराज तिला म्हणायचे, ‘‘कशाला जेवण देतेस ? त्याला उपाशी राहू दे. भूक लागल्यावर तो आपोआप घरी येईल.’’

५ आ ३. रघुवीरने ओढ्यात पोहणार्‍या मुलाला बुडवल्याने त्याच्या पोटात पाणी भरणे आणि त्याचे आई-वडील रघुवीरचे गार्‍हाणे घेऊन महाराजांकडे आल्यावर त्यांनी मंत्रसामर्थ्याने मुलाला बरे करणे : मी ओढ्यात पोहणार्‍या मुलांना मारायचो. मी त्यांच्या मानेवर पाय ठेवायचो आणि त्यांना बुडवण्याचा प्रयत्न करायचो. एकदा मी एका मुलाला पाण्यात बुडवले. तेव्हा त्याच्या पोटात पाणी भरले. त्या वेळी त्याचे आई-वडील त्याला घेऊन महाराजांकडे आले आणि म्हणाले, ‘‘महाराज, हे बघा ! आमच्या मुलाच्या पोटात पाणी भरले. तुमच्या मुलाने याला ओढ्यात बुडवले. त्याच्या पोटात पुष्कळ पाणी आहे. तो आता मरेल. काय करूया ?’’ महाराजांची तपश्चर्या चांगली होती. ते म्हणाले, ‘‘त्याला काही होणार नाही. तो बरा होईल.’’ तेव्हा महाराजांनी त्या मुलाला विभूती लावून मंत्र म्हटला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा त्या मुलाच्या तोंडातून खळखळून पाणी बाहेर पडले आणि तो बरा झाला.

५ आ ४. मुले रघुवीरची सर्व गार्‍हाणी मास्तरांकडे करत असल्याने रघुवीरने मास्तरांना मारायचे ठरवणे, झाडावर चढून त्याने त्यांच्या डोक्यात दगड घालणे आणि त्यामुळे ते रक्तबंबाळ होणे : मुलांनी पैसे चोरल्यावर ‘ते पैसे आम्ही घेतले नाहीत’, असे मुले मला खोटेच सांगायची, तसेच मुलांना मारले किंवा बुडवले, तर ती महाराजांकडे येतात आणि त्याचे गार्‍हाणे मास्तरांकडे करतात’, याचा राग मनात असल्याने मी मास्तरांना मारायचे ठरवले.

मी शाळा सुटायच्या वेळेत झाडाच्या शेंड्यावर चढून बसलो. मग मी एक दगड हातात घेतला. ‘मागच्या वाटेने मास्तर लघवीला जाणार’, हे मला ठाऊक होते. त्या वेळी मास्तर गांधी टोपी, धोतर आणि शर्ट घालायचे. मास्तर उभे असतांना मी त्यांच्या डोक्यात दगड घातला. ते रक्तबंबाळ झाले. त्या वेळी मी ८ वर्षांचा असल्याने काठीने मारत येणार नाही; म्हणून मी त्यांना दगड मारला. मास्तरांनी मुलांना विचारले, ‘‘दगड कुणी मारला असेल ?’’ तेव्हा सर्व मुलांनी सांगितले, ‘‘मारणारा एकच ‘रघ्या’ आहे. तो दगड मारून घरी पळाला असेल.’’ मी मारुतीच्या मंदिराच्या भिंतीवरून खाली उतरून घरी धूम पळालो. त्यानंतर मी परत शाळेत गेलोच नाही.

प.पू. भगवानदास महाराज आणि प.पू. रुक्मिणीबाई

५ इ. रघुवीरच्या उपद्व्यापांमुळे त्याला भोगावे लागलेले शारीरिक त्रास

५ इ १. खेळण्याच्या नादात पाण्याच्या हौदात पडल्यावर आईने हौदातून बाहेर काढणे आणि महाराजांनी पोटातील पाणी काढणे : विहिरीच्या बाजूला पाण्याचा एक मोठा चौकोनी हौद होता. त्यात पाणी पुष्कळ होते. मला पाण्यात पोहायचे आणि नाचायचे असल्याने मी त्या हौदावर चढलो आणि तेवढ्यात त्या हौदात पडलो. आईने ते बघितले आणि मला वर काढले. मग महाराजांनी माझ्या पोटातील पाणी काढले.

५ इ २. झाडावरून पडल्यावर टोकेरी दगड पायात घुसल्याने पायाला छिद्र पडणे आणि महाराजांनी मंत्र म्हणून हळद अन् चुना एकत्र करून त्या जखमेत भरणे : एकदा मी पेरूच्या झाडावर चढलो आणि त्याची फांदी तुटल्याने खाली भूमीवर पडलो. तिथे टोकेरी दगड होते. ते दगड माझ्या पायात घुसले आणि पायाला छिद्र पडले. त्या वेळी आधुनिक वैद्य नव्हते. तेव्हा महाराजांनी मंत्र म्हणून हळद आणि चुना एकत्र केला अन् माझ्या त्या जखमेत भरला. त्या जखमेची खूण अजून माझ्या पायावर आहे.

५ इ ३. झाडावरून पाय निसटून पाठीवर पडणे, त्या वेळी श्वास कोंडल्यासारखा होणे आणि आईने केलेल्या उपायांनी बरे वाटणे : एकदा मी नारळाच्या झाडाचे नारळ काढायला झाडावर चढलो आणि पाय निसटून पाठीवर जोरात पडलो. तेव्हा माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. माझा श्वास कोंडल्यासारखा झाला होता. आई म्हणत होती, ‘‘आता हा मरतो कि जगतो ?’’ त्या वेळी तेथे महाराज नव्हते. आईचेही सामर्थ्य पुष्कळ होते. तिने भगवान श्रीधरस्वामींचे भस्म, विभूती आणि तीर्थ सिद्ध करून दिले. मग मी बरा झालो. पुष्कळ वेळा झाडांवरून पडून मला झालेल्या जखमांच्या खुणा अजूनही माझ्या शरिरावर आहेत.

५ ई. मुलांनी एका मोठ्या वानराला दगड मारल्यावर वानर तेच दगड मुलांना मारू लागणे आणि रघुवीरने वानराला ‘मारू नकोस’, असे सांगितल्यावर वानर शांत बसणे : एकदा एक मोठे वानर राममंदिराच्या कळसावर आले होते. मी म्हणालो, ‘‘मारुति आला आहे.’’ तेव्हा मुले त्याला दगड मारायची. हे पाहून मुलांनी मारलेले दगड घेऊन ते वानरच त्या मुलांना मारायला लागले. मुले घाबरून माझ्याकडे येऊन सांगायची, ‘‘रघ्या बघ. ते वानर आम्हाला मारत आहे.’’ तू त्याला ‘मारू नकोस’, असे सांग; म्हणून मग मी त्या वानराला म्हटले, ‘‘मारू नकोस बाबा ! मी तुझ्या पाया पडतो.’’ मी असे म्हटल्यावर ते वानर शांतपणे येऊन मंदिराच्या कळसावर बसून रहायचे.

५ उ. एकदा प.पू. भगवानदास महाराजांनी रघुवीरला ज्या हातांनी मारले होते, त्या हाताचा अस्थिभंग होणे आणि ‘वयाच्या पंधराव्या वर्षानंतर रघु आपोआप शांत होईल’, असे भागवत महाराज यांनी सांगणे : एकदा प.पू. भगवानदास महाराज यांनी मला रागाने मारले. त्यानंतर अंघोळ करतांना ते विहिरीकडे पडले आणि ज्या हाताने त्यांनी मला मारले होते, त्या हाताचा अस्थिभंग झाला. त्या वेळी गळदग्याची वाडी (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथे भागवत महाराज आले होते. त्यांनी महाराजांना सांगितले, ‘‘याला फार डिवचायला जाऊ नका. याच्या नादाला लागू नका. तुम्हाला त्रास होईल. वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत हा असाच राहील. नंतर आपोआप शांत होईल.’’

५ ऊ. रघुवीरने खोड्या केल्यावरही त्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

५ ऊ १. सांगितलेले न ऐकल्याने महाराजांनी रघुवीरला रागावणे आणि रघुवीरने झाडावरून महाराजांकडे रागाने फेकलेल्या दगडांचे बारीक खडीसाखरेत रूपांतर होणे : मी लहान असतांना एकदा महाराजांच्या समवेत सौंदत्ती (जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथे गेलो होतो. तेथे मी एका झाडावर चढून खेळत बसलो होतो. महाराज तेथे आले आणि त्यांनी मला खाली उतरायला सांगितले. मी ऐकत नसल्याने ते मला रागावू लागले. त्या वेळी मीही झाडावर अडकून राहिलेले दगड घेऊन रागाने त्यांच्याकडे फेकले. तेव्हा त्या दगडांचे रूपांतर बारीक खडीसाखरेत झाले. त्यामुळे महाराजांना काही लागले नाही. आम्ही ती खडीसाखर गोळा करून घरी घेऊन आलो आणि नंतर ती सर्वांनी मिळून खाल्ली.

५ ऊ २. एकदा मुलांनी मला त्रास दिला. माझ्या खोड्या काढल्यानंतर मी त्यांना भूमीवरील माती आणि धूळ फेकून मारली. तेव्हा ती माती आणि धूळ यांचे काजू अन् मनुके सिद्ध झाले होते.’

(क्रमशः)

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२०)