अबुझमाड (छत्तीसगड) येथे आदिवासींकडून धर्मांतराच्या विरोधात आंदोलन

प्रशासनाने धर्मांतराच्या घटनांना चाप न लावल्यास कठोर आंदोलन करण्याची चेतावणी !

  • धर्मांतराच्या विरोधात शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस निष्क्रीय असल्यामुळेच अशा प्रकारे आदिवासींनाच रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणे, हे लज्जास्पद ! – संपादक
  • ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करणार्‍या काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या धर्मांतराच्या घटना रोखल्या न जाणे, यात नवल ते काय ? – संपादक
(प्रतिकात्मक छायाचित्र)

अबुझमाड (छत्तीसगड) – छत्तीसगड राज्यातील अबुझमाड या नक्षलग्रस्त भागामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या गरीब आदिवसींच्या धर्मांतराच्या विरोधात आदिवासी ग्रामस्थांनी आंदोलन चालू केले आहे. येथील १० ग्रामपंचायतीच्या आदिवासींनी संघटीत होऊन हे आंदोलन चालू केले आहे. त्यांनी प्रशासनाला चेतावणी दिली की, जर आदिवासींचे धर्मांतर करणे बंद झाले नाही, तर कठोर आंदोलन करण्यात येईल.

याआधी आदिवासी ग्रामस्थांनी बैठक घेतली. त्यात ‘आदिवासी संस्कृती वाचवणे, हे आमचे ध्येय असून षड्यंत्र रचणार्‍यांना सोडणार नाही’, असे या ग्रामस्थांनी म्हटले. ज्या आदिवासींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे, त्यांना ‘धर्मांतर केल्यामुळे आदिवासी म्हणून तुम्हाला मिळणारे लाभ आणि आरक्षण मिळणार नाही’, असे सांगत पुन्हा हिंदु धर्मांमध्ये येण्याचे आवाहन केले. धर्मांतरामुळे या भागामध्ये वाद आणि हिंसाचार यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ‘या रोखण्यासाठी आपल्याला संघटीत होऊन राहिले पाहिजे’, असेही आदिवासींनी म्हटले आहे.